(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरालगतच्या कारवांचीवाडी फाट्यावर १ मे रोजी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. प्रभाकर शांताराम साळवी (वय ६६, रा. रॉयल अपार्टमेंट, श्रीनगर-खेडशी) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साळवी हे कारवांचीवाडी फाटा येथे रस्ता ओलांडत असताना रत्नागिरी-हातखंबा मार्गावरून भरधाव वेगात येणाऱ्या (एमएच ०८ बीई ३३७९) क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. अभिजीत प्रभाकर मोहीते (रा. एमआयडीसी मिरजोळे) हा चालक वाहन चालवत होता. धडकेची तीव्रता मोठी असल्याने साळवी गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर स्थानिकांनी तत्परता दाखवत साळवी यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाहतूक सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी रुपेश सुधाकर सुर्वे (वय ३५, रा. खेडशी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित चालकाविरोधात भारतीय दंड संहिता २०२३ मधील कलम १०६ (९), १२५ (अ), २२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.
कारवांचीवाडी येथील फाटा हा दिवसेंदिवस अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळख निर्माण करत आहे. या ठिकाणी दुतर्फा येणाऱ्या वाहनांचा वेग प्रचंड असल्याने वाहतूक नियंत्रणाचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. महामार्गासारख्या गतीने धावणारी वाहने आणि त्यात अचानक येणारी स्थानिक वाहतूक यामुळे परिस्थिती अधिकच धोकादायक बनत आहे. याशिवाय, ग्रामीण पोलिस ठाण्याकडून येणाऱ्या रस्त्यावरून सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. या दोन दिशांच्या वाहतुकीचा संगम होत असल्याने या ठिकाणी कायमच गर्दीचे चित्र पाहायला मिळते. परिणामी, रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांसाठी हा फाटा अक्षरशः जीवघेणा ठरत असून, प्रत्येक वेळी रस्ता पार करताना भीतीचे वातावरण निर्माण होते.

