( खेड )
खेड तालुक्यात जन्म व मृत्यू दाखले मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष वेधत भाजपा अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले यांनी खेड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन ऑनलाइन पोर्टलमधील तांत्रिक बिघाड तातडीने दूर करण्याची मागणी केली.
सध्या जन्म-मृत्यू नोंदणीचे ऑनलाइन पोर्टल तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याने नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले मिळण्यात अडथळे येत आहेत. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा, विविध शासकीय योजना तसेच इतर प्रशासकीय कामांवर होत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
या परिस्थितीची गंभीर दखल घेत खेड नगरपरिषदेकडून तात्पुरत्या स्वरूपात ऑफलाइन दाखले देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील सर्व शाळांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या असून, ऑनलाइन पोर्टल सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश किंवा इतर शैक्षणिक प्रक्रिया केवळ जन्मदाखल्याअभावी थांबवू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पोर्टल सुरळीत सुरू झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे अधिकृत जन्म व मृत्यू दाखले उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही नगरपरिषदेकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने हे पाऊल सकारात्मक मानले जात आहे.
निवेदनाद्वारे ऑनलाइन पोर्टलमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून जन्म व मृत्यू दाखले वेळेत, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून द्यावेत, तसेच नागरिकांना अनावश्यक हेलपाटे मारावे लागू नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने पाठपुरावा करत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे आणि भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अॅड. मिलिंद (दादू) नांदगांवकर उपस्थित होते.

