(रत्नागिरी /प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी जिल्हा मुख्यालय असूनही रत्नागिरीत केंद्र उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची वर्षानुवर्षे होत असलेली गैरसोय अखेर दूर झाली आहे. यासंदर्भातील वास्तवाला प्रसिद्धी मिळाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेत यंदापासून रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात परीक्षा केंद्रांना मंजुरी दिली आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माण, नर्सिंग, कृषी आदी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाणारी ही परीक्षा दरवर्षी जिल्ह्यातील सुमारे सहा ते सात हजार विद्यार्थी देतात. संगणकाधारित पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेसाठी सुसज्ज संगणक प्रयोगशाळांची आवश्यकता असल्याने आतापर्यंत विद्यार्थ्यांना भरणे (खेड) किंवा खेडर्डी (चिपळूण) येथे जावे लागत होते. जिल्ह्यातील केवळ दोनच केंद्रांवर परीक्षा होत असल्याने, तसेच परीक्षेपूर्वी किमान दोन तास आधी उपस्थित राहणे बंधनकारक असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब पालकमंत्री उदय सामंत यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्यानंतर त्यांनी रत्नागिरीतच केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार यंदा प्रथमच जिल्हा मुख्यालयात परीक्षा केंद्र कार्यान्वित झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, दोन्ही केंद्रांवरील उपस्थितीचे चित्रही लक्षवेधी ठरले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात १८० संगणकांच्या साहाय्याने ४,८४६ विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी ४,५६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २७२ विद्यार्थी गैरहजर राहिले. तर शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात १०० संगणकांच्या आधारे २,८९२ विद्यार्थ्यांची बैठक क्षमता होती. येथे २,७७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, १२२ विद्यार्थ्यांनी अनुपस्थिती दर्शवली. एकूणच, रत्नागिरीतच परीक्षा केंद्र उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा त्रास, वेळेची कसरत आणि खर्च यामध्ये मोठी बचत झाली असून, शैक्षणिक सोयी-सुविधांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरत आहे.

