(मुंबई)
राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी आज (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष या यादीकडे लागले असून, पहिल्या नियमित फेरीत किती विद्यार्थ्यांना पसंतीच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळतो याची उत्सुकता वाढली आहे.
राज्यातील 9 हजार 591 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण 21 लाख 98 हजार 666 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी नियमित फेरीसाठी 17 लाख 42 हजार 423 जागा राखीव आहेत. अकरावी प्रवेशासाठी राज्यभरातून 12 लाख 49 हजार 516 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 9 लाख 4 हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-2 भरला आहे.
सकाळी 11 वाजता जाहीर होणार पहिली मेरिट लिस्ट
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे. पोर्टलवर विद्यार्थ्यांना मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती आणि गुणवत्ता यादी पाहता येणार आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे माहितीही पाठवली जाणार आहे. विद्यार्थ्यांना 29 मे ते 3 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यास प्रवेश बंधनकारक
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळेल, त्यांना त्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक राहणार आहे. जर विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला किंवा प्रवेश घेतला नाही, तर त्यांना पुढील एका प्रवेश फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार आहे. प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्यांनी पोर्टलवर ‘Proceed for Admission’ या पर्यायावर क्लिक करणे आवश्यक आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
कटऑफ वाढण्याची शक्यता
पहिल्या गुणवत्ता यादीतील कटऑफ यंदा अधिक राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळणार नाही, त्यांना पुढील फेरीपूर्वी महाविद्यालयांचा पसंतीक्रम बदलण्याची संधी दिली जाणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी मागील वर्षांच्या कटऑफचा अभ्यास करून पसंतीक्रम भरल्यास पहिल्याच यादीत प्रवेश मिळण्याची शक्यता वाढू शकते, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
व्यवस्थापन, संस्थाअंतर्गत आणि अल्पसंख्यांक कोट्याअंतर्गत प्रवेशाची पहिली यादी देखील आजच प्रसिद्ध केली जाणार आहे. कोटा प्रवेश पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रिक्त जागांची माहिती महाविद्यालयांना प्रसिद्ध करावी लागणार आहे.
1 जुलै किंवा 15 जुलैपासून सुरू होणार वर्ग
अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी 5 जूननंतर जाहीर होणार आहे. त्यानंतर उर्वरित प्रवेश फेऱ्याही टप्प्याटप्प्याने पार पडतील. शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार, अकरावीचे वर्ग 1 जुलै किंवा 15 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
अकरावी प्रवेशासाठी एकूण 5 फेऱ्या
अकरावी प्रवेशासाठी यंदा एकूण पाच प्रवेश फेऱ्या होणार आहेत. शेवटची फेरी मुलींसाठी विशेष असणार आहे. प्रत्येक प्रवेश फेरीपूर्वी नव्याने नोंदणी करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. अधिकृत संकेतस्थळावर https://mahafyjcadmissions.in विद्यार्थ्यांना नोंदणी आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

