(मुंबई)
एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना बसचा अचूक ठावठिकाणा समजावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) ‘आपली एसटी’ (Aapli ST) या नावाने नवं ॲप सादर केलं आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. सध्या राज्यभरातील १२ हजारहून अधिक बसेस आणि तब्बल १ लाख मार्गांचे मॅपिंग या ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. भविष्यात सर्व बसेस या ॲपच्या कार्यकक्षेत आणल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
प्रवास होणार अधिक सुलभ
ॲपमुळे सर्वसामान्य मराठी प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि पारदर्शक होईल यासाठी अधिक भर दिला जाणार आहे. ‘आपली एसटी’ हे नाव प्रवाशांच्या मनात आपुलकी निर्माण करेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. या ॲपमुळे प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि पारदर्शक होईल, असं ते म्हणाले. सुरुवातीच्या टप्प्यात तांत्रिक त्रुटी आढळल्यास प्रवाशांनी अभिप्राय देण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
‘रोजमाल्टा ऑटोटेक लि.’ या कंपनीच्या सहाय्याने विकसित केलेल्या ‘आपली एसटी'(Aapli ST) ॲपमुळे प्रवाशांना त्यांच्या जवळच्या बस स्थानकाची माहिती मिळणार आहे. प्रवासी माहिती केंद्राद्वारे (Passenger Information System) बस कुठून सुटणार (STD) आणि ती बस थांब्यावर केव्हा पोहोचणार (ETA) याची रिअल टाईम माहिती मिळेल. त्यामुळे प्रवाशांना थांब्यावर जास्त वेळ घालवण्याची गरज पडणार नाही. प्रवासी बस उपलब्धतेनुसार थेट थांब्यावर पोहोचतील. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ॲपमध्ये आपत्कालीन क्रमांकांची यादी देखील देण्यात आली असून, एकाच क्लिकमध्ये कोणत्याही आपत्कालीन क्रमांकावर कॉल करता येणार आहे.
ॲपच्या प्रमुख सुविधा :
- बसस्थानक शोध : जवळच्या थांब्याची माहिती मिळणार.
- प्रवासी माहिती प्रणाली (PIS) : बस कुठून सुटणार (STD) आणि थांब्यावर केव्हा पोहोचणार (ETA) याची थेट माहिती.
- लाईव्ह ट्रॅकिंग : आरक्षण केलेल्या तिकीटातील बस क्रमांक टाकून बसचा मागोवा घेता येईल.
- वेळापत्रक : दोन थांब्यांदरम्यानच्या बससेवांची माहिती उपलब्ध.
- सुरक्षा सुविधा : आपत्कालीन क्रमांकांची यादी, ज्यावर एकाच क्लिकमध्ये कॉल करता येईल.
सध्या ॲपवर १२ हजार बसांचा लाईव्ह डेटा उपलब्ध असून, लवकरच आगाऊ तिकीट बुकिंग ॲपमध्येही बसची थेट माहिती (Live Data) समाविष्ट केली जाणार आहे. यामुळे आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाही अधिक सोयी मिळतील.
सरनाईक म्हणाले, “एसटीचा उद्देश प्रवाशांना अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देण्याचा आहे. ‘आपली एसटी’ ॲप हे त्याकडे टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे. प्रवाशांच्या सूचनांनुसार ॲपमध्ये सातत्याने सुधारणा केली जाईल.” सध्या हे ॲप ‘MSRTC Commuter App’ या नावाने गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. मात्र लवकरच प्रवाशांना ते ‘आपली एसटी’ या नव्या नावाने दिसणार आहे.

