राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. अवघ्या काही तासांत मतदान प्रक्रिया पार पडणार असताना अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने राजकीय पक्षांत नाराजी आहे. दुसरीकडे प्रचार मोहीम पूर्णपणे थंडावली असून प्रशासन व पोलीस यंत्रणा निवडणूक सुरळीत आणि पारदर्शक पार पाडण्यासाठी सज्ज आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन रोखणे आणि मतदारांना प्रलोभने दाखवली जाणार नाहीत यासाठी सर्व स्तरावर कडक नजर ठेवली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर हिंगोली शहरात मोठी कारवाई करत पोलिसांनी तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. अचानक सापडलेल्या या मोठ्या रकमेने खळबळ उडाली असून निवडणूक संवेदनशीलतेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
शेतकरी भवन परिसरात पोलिस पथकाने टाटा नेक्सन कारची तपासणी केली असता पांढऱ्या रंगाच्या बॅगमध्ये 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलांचा मोठा साठा आढळला. तात्काळ ही रोकड ताब्यात घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पाठवण्यात आली. या संपूर्ण रकमेची मोजणी करण्यात आली, निवडणूक विभागाचे अधिकारी या प्रकाराची प्राथमिक चौकशी करत आहेत.
दरम्यान, प्राथमिक माहितीप्रमाणे ही रोकड एका खासगी व्यापाऱ्याची असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने “आमच्याकडे रोकड बाळगण्याची परवानगी आहे,” असे सांगितले असले तरी निवडणूक काळातील कडक नियमांमुळे विभागाने रोकड तात्पुरती जप्त केली आहे. कारमध्ये असलेल्या व्यक्तींकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड मिळाल्याने परिसरात खळबळ असून पोलिस आणि निवडणूक विभाग सर्व अंगांनी तपास सुरू केला आहे.

