( शिर्डी )
देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबांवर भक्तांची अढळ श्रद्धा आहे. साईबाबांच्या कृपेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाविक विविध स्वरूपात दान अर्पण करत असतात. याच भक्तिभावातून मध्यप्रदेशातील हरदासपूर येथील साईभक्त तेज बहादुर सिंह यांनी साईबाबांच्या चरणी तब्बल २० लाख रुपयांचा सुवर्ण मुकुट अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली आहे.
मध्यप्रदेशातील हरदासपूरचे रहिवासी असलेले तेज बहादुर सिंह हे २००२ पासून नियमितपणे शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहेत. गेल्या २४ वर्षांपासून साईबाबांवर त्यांची अढळ श्रद्धा असून, आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर साईबाबांची कृपा लाभल्याचा त्यांनी अनुभव सांगितला.
“आयुष्यात साईबाबांकडे जे काही मागितलं, ते मला मिळालं. तब्बल २४ वर्षांनंतर साईबाबांच्या कृपेने मला पुत्रप्राप्ती झाली. जीवनात अनेक मोठी संकटं आली, पण साईबाबांनी प्रत्येक वेळी मला त्यातून बाहेर काढलं,” असे तेज बहादुर सिंह यांनी सांगितले.
पूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन व्यतीत करणाऱ्या तेज बहादुर सिंह यांनी आज मिळवलेले यश, सुख-समृद्धी आणि समाधान हे सर्व साईबाबांच्या कृपेचे फलित असल्याचे नमूद केले. “आज माझ्याकडे जे काही आहे, ते सर्व साईबाबांच्या कृपेनेच आहे. त्यामुळे त्यांच्या चरणी काहीतरी अर्पण करावं, या भावनेतूनच हा सुवर्ण मुकुट अर्पण केला,” असेही त्यांनी सांगितले.
आज भक्तिभावाने अर्पण करण्यात आलेला हा सुमारे २०० ग्रॅम वजनाचा, आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट असून त्याची किंमत अंदाजे २० लाख १६ हजार रुपये आहे. सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर तो साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराव दराडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराव दराडे यांनी दानशूर साईभक्त तेज बहादुर सिंह यांचा सत्कार करत त्यांच्या श्रद्धा आणि योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

