(मुंबई)
मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला अखेर मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. “आपण जिंकलो रे!” अशी घोषणा जरांगे यांनी केली.
सरकारकडून घेतलेले निर्णय
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेऊन सरकारचा अंतिम मसुदा सादर केला. यामध्ये प्रमुख बाबी पुढीलप्रमाणे आहेत :
- हैदराबाद गॅझेट : तात्काळ अंमलबजावणीस मंजुरी.
- सातारा संस्थान गॅझेट : कायदेशीर बाबी तपासून निर्णय.
- दाखल गुन्हे : आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरुवात; शिल्लक गुन्हे सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत मागे घेतले जातील.
- आंदोलनातील हुतात्मे : बलिदान दिलेल्या कुटुंबांना आधी १५ कोटी रुपये दिले; उर्वरित मदत आठवड्यात मिळणार. तसेच कुटुंबातील एकाला राज्य परिवहन महामंडळात नोकरी दिली जाणार.
- जात प्रमाणपत्रे : प्रलंबित दाखले निकाली काढण्याचे आदेश.
- वंशावळ समिती : तातडीने गठित करण्याचा निर्णय.
- शिंदे समिती : कार्यालय उपलब्ध करून देणे व नोंदी शोधण्याचे काम सुरू ठेवणे.

जरांगेंनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत मराठा समाजाच्या भावनांना न्याय मिळाल्याचे सांगितले. मात्र, “मराठा-कुणबी हे एकच आहेत, असा शासन निर्णय काढावा” अशी ठाम मागणी त्यांनी सरकारपुढे ठेवली आहे. त्यावर सरकारला आणखी दोन महिन्यांचा वेळ देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारकडून अनेक मागण्या मान्य झाल्याची घोषणा होताच आंदोलकांनी जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात मनोज जरांगे यांच्या नावाच्या घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर उपोषण मागे घेण्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे. सरकारने मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य केल्याने रात्री ९ वाजेपर्यंत सर्व आंदोलकांना मुंबई सोडून आपापल्या गावी परत जाण्याचे आवाहन जरांगे यांनी केले आहे. सरकारने अंमलबजावणी आणि जीआर दिला तर रात्री ९ वाजता मुंबई खाली होईल, असे ते म्हणाले.
Hydrabad Gazzette GR dt.०२.०९.२०२५,
(मराठा समाज आरक्षण संदर्भातील नवीन GR)

