( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारा धक्कादायक गुन्हेगारी प्रवास उघड झाला आहे. जयगड परिसरातील दुर्वास पाटील या नराधमाने एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन खून केल्याचा थरारक खुलासा पोलिसांच्या तपासात झाला आहे. सुरुवातीला भक्ती मयेकरच्या हत्येच्या तपासातून उलगडत गेलेल्या या प्रकरणामध्ये सीताराम वीर, राकेश जंगम आणि शेवटी भक्ती मयेकर आणि तिच्या गर्भातील निष्पाप बाळाचाही बळी दुर्वासच्या क्रौर्याला पडल्याचे समोर आले आहे. या खुन्यांच्या साखळीने उघडकीने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात या रक्तरंजित घटनांनी समाजमन सुन्न केले आहे.
सीताराम वीर हे खुनी दुर्वास पाटीलच्या “सायली बार”मध्ये कामाला होते. कामाच्या वादातून त्यांना दुर्वासने बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूचे खरे कारण लपवून ठेवत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. दुसरा नंबरवर राकेश जंगम (28, वाटद-खंडाळा) हा होता. त्याला संपवण्याचे कटकारस्थान रचले. कारण राकेशला सीताराम वीर यांच्या खुनाची माहिती होती. त्यामुळे तोही दुर्वासच्या टार्गेटवर आला. “कोल्हापूरला चाललो आहे” असा बहाणा करून दुर्वास पाटील आणि त्याचा साथीदार नीलेश भिंगार्डे यांनी राकेशचा आंबाघाटात खून करून मृतदेह फेकून दिला. ६ जून २०२४ रोजी बेपत्ता झाल्यानंतर राकेश वर्षभर गायब होता, मात्र त्याचा खून उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
यानंतर दुर्वासच्या क्रौर्याचा बळी ठरली मिरजोळे येथील भक्ती मयेकर (26, मिरजोळे). तिला बारमध्ये बोलावून कट रचल्याप्रमाणे दोरीने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. आणि त्यानंतर मृतदेह आंबाघाटात फेकून दिला गेला, जिथे तो दहा दिवस कुजत पडून राहिला. भक्तीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयाची सुई दुर्वासवर केंद्रित केली आणि रक्तरंजित कारवायांचा सिलसिला उलगडत गेला आहे. या एका मागोमाग एक प्रकरणांच्या उघडकीने जिल्हा हादरला असून समाजमन संतप्त झाले आहे.
भक्तीच्या खुनानंतर पोलिसांनी दुर्वास पाटीलला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने एकामागून एक खुनांची कबुली दिली आहे. तपासादरम्यान सीताराम वीर यांच्या हत्येचा धागाही पोलिसांच्या हाती लागला. विशेष म्हणजे, सीताराम वीर यांच्या हत्येत सहभागी झालेला राकेश जंगम हाही नंतर दुर्वासच्या क्रौर्याचा बळी ठरला, हा तपासातील धक्कादायक खुलासा आहे. वीर यांच्या हत्ये प्रकरणी दुर्वास पाटीलसह विश्वास विजय पवार,( वय ४१ वर्षे रा, कळझोंडी ) तिसरा आरोपी राकेश अशोक जंगम (वय २८ वर्षे रा. खंडाळा कोकणनगर) या तिघांवर जयगड पोलिसांनी कलम ३०२ (खून), २०१ (पुरावा नष्ट करणे), आणि ३४ (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या खुनी दुर्वास पाटीलसह त्यांच्या इतर sसाथीदारांना भक्ती मयेकर खून प्रकरणी न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा हादरला, संतापाची लाट उसळली
गणेशोत्सवाच्या आनंदमयी वातावरणात एकाच नराधमाने केलेल्या या तीन हत्या जिल्ह्यात धसका निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत. मानवतेलाच काळीमा फासणाऱ्या या घटनेने जिल्ह्यातील नागरिक स्तब्ध झाले असून, समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

