(संगमेश्वर / एजाज पटेल)
गेले दोन दिवस तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे फुणगूस–जाकादेवी मुख्य रस्त्यावर कोंडये गावाकडे जाणाऱ्या मार्गावर, वगडे फाट्याच्या पुढे एक मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्याने या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनधारक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
कोंडये वगडे फाट्यापुढील हा मार्ग कोंडये मधलीवाडी, दसमवाडी, बौद्धवाडी, वरचा मळा, खालचा मळा, देसाईवाडी तसेच डावखोल आणि पुढे कळकदे-कोंडकडे जाण्यासाठीचा जवळचा व नियमित वापरला जाणारा रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसभर एसटी बसेससह खाजगी वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या मधोमध झाड कोसळल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी एसटी बस सेवा सोयने फाटा मार्गे वळवण्यात आली, तर काही खाजगी वाहने सुवरेवाडीमार्गे पर्यायी ग्रामीण रस्त्याने पुढे जात आहेत.
या घटनेमुळे विद्यार्थी, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने कोसळलेले झाड हटवून रस्ता पूर्ववत खुला करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

