( विशेष /प्रतिनिधी )
रत्नागिरी तालुक्यातील जयगड परिसरात उलगडणाऱ्या घटनांमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. भक्ती मयेकर हत्येच्या मुख्य आरोपी दुर्वास पाटीलने पोलिस चौकशीत दिलेली धक्कादायक कबुली आता स्थानिक तपासयंत्रणांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उभे करते. कारण हा तोच दुर्वास, ज्याने भक्ती मयेकरपूर्वीच राकेश अशोक जंगम, सीताराम वीर या दोघांचा खून केला होता आणि पोलिसांना या घटनेचा सुगावा लागायलाच वर्षभराहून अधिक काळ लोटला.
दिनांक ६ जून २०२४ रोजी रात्री ११ वाजता घरातून कपड्यांची बॅग घेऊन बाहेर पडलेला राकेश जंगम घरी परतलाच नाही. यानंतर राकेश जंगम यांच्या आई वंदना जंगम यांनी २१ जून २०२४ रोजी जयगड पोलिस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल केली. त्यानंतर काय झाले? फाईल धुळ खात पडून राहिली. शोधमोहीम केवळ कागदोपत्री मर्यादित राहिली. प्रत्यक्ष कारवाई काहीच नाही. राकेशचा जीव वाचवता आला असता का, हा मूलभूत प्रश्न अनुत्तरित राहतो. जेव्हा दुर्वास पाटील याला भक्ती मयेकर खून प्रकरणी अटक झाली, तेव्हा चौकशीत त्याने वर्षभरापूर्वीच्या खुनाचीही कबुली दिली. त्याने विश्वास पवार (वय ४१, रा. कळझोंडी) आणि निलेश भिंगार्डे ( वय ३५, रा. इस्लामपूर, जि. सांगली ) या साथीदारांसह राकेशचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून दिल्याचे उघड झाले आहे. हा तपशील उघड झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ अटक दाखल केली.
परंतु दुर्वास पाटीलने केलेल्या खून प्रकरणातून सवाल अधिक तीव्र झाले आहेत. वर्षभर आरोपी मोकाट कसा फिरला? जयगड पोलिसांकडून हे दुर्लक्ष होते की निष्काळजीपणा? जयगड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जंगम यांच्या बेपत्ता तक्रारीला तेव्हाच गांभीर्य दिले असते, तर कदाचित भक्ती मयेकरचा जीव गेला नसता. खुनी प्रवृत्तीचा दुर्वास पाटील हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे समोर आले, गुन्हेगार गावात मोकळे फिरत असताना जयगड पोलिसांना त्याचा गंधही लागला नाही का? या दुहेरी खुनामुळे परिसरात शांततापूर्ण वातावरण आहे. परंतु भीती फक्त गुन्हेगाराची नाही, तर पोलिसांच्या निष्क्रियतेचीसुद्धा आहे. दरवेळी गुन्हा घडल्यानंतरच तपासाची चक्रे फिरणार असतील, तर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास हळूहळू उडत जाणे साहजिकच आहे. सध्या प्रश्न केवळ आरोपींवर कारवाईचा नाही, तर जयगड पोलिसांच्या कामकाजावर जबाबदारी निश्चित करण्याचा आहे. बेपत्ता प्रकरणाच्या तपासात ढिलाई का झाली? बेपत्ता तक्रारीपासून खुनापर्यंतचा प्रवास एवढा वेळ का लागला? या दुर्लक्षामुळे निरपराध जीव गेले, तर याची जबाबदारी कोण स्वीकारणार? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
जयगड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
भक्ती मयेकरच्या खून प्रकरणात अखेर रत्नागिरी शहर पोलिसांनी कसून तपास केला आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. प्रियकर दुर्वास पाटील व त्याच्या साथीदारांची कबुली, मृतदेहाचा शोध आणि गुन्ह्याची साखळी स्पष्ट करण्यात शहर पोलिसांचे पथक यशस्वी ठरले. मात्र, या सगळ्या प्रकरणामुळे एक मूलभूत प्रश्न उपस्थित होतो. मग जयगड पोलिस काय करत होते?
जंगम यांची बेपत्ता तक्रार दाखल होऊनसुद्धा तपासाची दिशा का ठरली नाही? खुनाचा सुगावा लागण्यासाठी शहर पोलिसांना पुढे यावे लागले, हे जयगड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. जयगड पोलिस फक्त तक्रारींच्या नोंदीपुरते मर्यादित आहेत का? जर शहर पोलिसांनी जबाबदारी घेतली नसती, तर भक्तीचा खून गूढच राहिला असता का? या खुनाच्या घटनेनंतर जयगड पोलिसांचा कारभार चर्चेत आला असून, त्यांच्या तपास पद्धतीवर थेट नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. गुन्हेगार गजाआड केले गेले असले तरी जयगड पोलिसांची जबाबदारी आणि तपासातील निष्काळजीपणा हाच आता खरा तपासाचा मुद्दा ठरणार आहे.
जयगड पोलिसांच्या दुर्लक्षावर कारवाई होणार का?
भक्ती मयेकर खूनप्रकरणात रत्नागिरी शहर पोलिसांच्या तपासामुळे सत्य बाहेर आले आहे, मात्र यामुळे जयगड पोलिसांच्या भूमिकेवर गडद सावली पडली आहे. राकेश जंगम यांच्या बेपत्ता तक्रारीपासून खुनापर्यंतचा प्रवास घडूनही स्थानिक ठाण्यातील अधिकारी निष्क्रिय राहिले. यावर आता जिल्हा पोलिस अधीक्षक काय पावले उचलणार, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. फक्त आरोपींना तुरुंगात टाकून प्रकरण आटोपेल, पण ज्यांच्या दुर्लक्षामुळे आरोपी मोकाट फिरले त्या जयगड पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? पोलिस अधीक्षकांकडून कठोर पावले उचलली गेली तरच नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल. अन्यथा, पोलिस दलावरच प्रश्नचिन्ह कायम राहील.

