(रत्नागिरी / प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील सुरक्षित आणि नियमित पाणीपुरवठ्यास गती देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर आणि गुहागर तालुक्यांतील एकूण सहा नळ पाणीपुरवठा योजनांसाठी ६ कोटी ३६ लाख ४५ हजार रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने १७ फेब्रुवारी रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला.
लांजा तालुक्यातील चार योजनांचा या निर्णयात समावेश असून मौजे मठ कडूगाव (६९.१४ लाख), केळंबे (१ कोटी ३२.५१ लाख), पालू माचाळ (१ कोटी ७९.८३ लाख) आणि बनखोर (१ कोटी १३.६३ लाख) या गावांसाठी सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. राजापूर तालुक्यातील मौजे विल्ये-शेंगाळेवाडी येथील योजनेसाठी ६७.९० लाख, तर गुहागर तालुक्यातील मौजे रानवी येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ७३.४४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व योजनांची एकत्रित सुधारित मान्यता रक्कम ६ कोटी ३६ लाख ४५ हजार इतकी आहे.
सदर योजनांना यापूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक बाबी, दरवाढ व वाढीव कामांचा खर्च लक्षात घेऊन अंदाजपत्रकात सुधारणा आवश्यक ठरली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाकडे सुधारित प्रस्ताव सादर केला होता. शासनस्तरावर त्यास मंजुरी मिळाल्याने प्रलंबित कामांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात शाश्वत जलस्रोत उभारणी, पाइपलाइन जाळ्याचे सुदृढीकरण आणि घरगुती नळजोडण्यांची वाढ यासाठी ही मान्यता महत्त्वाची ठरणार असून, जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त वाड्या-वस्त्यांना दिलासा मिळणार आहे.

