(रत्नागिरी)
निसर्गरम्य आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आज बुधवारी (४ जून) एक दुर्मिळ सागरी जीव मृतावस्थेत आढळून आला. सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना वाळूमध्ये सुमारे चार फूट लांबीचा एक मृत डॉल्फिन (देवमासा) पडलेला दिसला.
किनाऱ्यावर शांततेचे वातावरण असताना मृत डॉल्फिन पाहून अनेकांनी त्याच्या दिशेने धाव घेतली. डॉल्फिनच्या शरीरावर कोणत्याही मोठ्या जखमेचे स्पष्ट निशाण दिसत नसल्याने त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. डॉल्फिन कोणत्या प्रजातीचा आहे आणि मृत्यूमागील कारण काय, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि वनविभागाला याबाबत कळविण्यात आले. प्रशासनाने मृत डॉल्फिनला किनाऱ्यावरून सुरक्षितपणे हटवण्याची प्रक्रिया सुरू केली असून, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतरच यामागील नेमके कारण उघड होणार आहे.
विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांमध्ये समुद्रातील प्रदूषण, जलवाहतुकीतून होणाऱ्या धडक, वादळे आणि हवामान बदल यांमुळे सागरी जीवांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मृत डॉल्फिनची ही घटना याच पार्श्वभूमीवर सागरी पर्यावरणाच्या संवर्धनाचा विषय पुन्हा ऐरणीवर आणणारी ठरली आहे.