(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरालगतच्या एमआयडीसी परिसरात रविवारी मध्यरात्री भाजप आणि शिंदेसेनेशी संबंधित कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आर्थिक व्यवहारातून सुरू झालेल्या वादाने पुढे उग्र रूप धारण केल्याने दोन्ही गट आमनेसामने आले आणि त्याचे पर्यवसान राड्यात झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत दोन्ही बाजूंचे काही जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे येथील एक युवक वेल्डिंग व्यवसायाशी संबंधित असून पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून तो भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी गेला होता. यावेळी दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर लवकरच धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले. संबंधित युवकाला मारहाण झाल्याची माहिती गावात पोहोचताच वातावरण तापले.
यानंतर मिरजोळे येथील काही संतप्त तरुणांनी एकत्र येत संबंधित पदाधिकाऱ्याच्या घराकडे धाव घेतली. दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि परिसरात जोरदार हाणामारी उफाळून आली. या झटापटीत मिरजोळे येथील एका युवकाचा पाय मोडल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे, भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्याच्या भावालाही गंभीर मारहाण झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.
वर्षभराच्या मतभेदांची पार्श्वभूमी?
दरम्यान, हा संघर्ष केवळ आर्थिक व्यवहारापुरता मर्यादित नसून दोन्ही गटांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वाद आणि कुरबुरींची ही परिणती असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर रंगू लागली आहे. जुन्या खुन्नसचा हिशेब चुकता करण्यासाठीच ही संधी साधली गेल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे या घटनेला केवळ क्षणिक वादाचे स्वरूप नसून त्यामागे दीर्घकाळ साचलेला संघर्ष असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील वाद रस्त्यावर उतरून हिंसक स्वरूप धारण करीत असल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेमुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळातही विविध चर्चांना उधाण आले आहे.

