(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड येथे जन आरोग्य समितीची सभा गुरुवार, दि. २५ जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेचे अध्यक्षस्थान समितीचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश उर्फ राजू साळवी यांनी भूषवले.
सभेमध्ये आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच रुग्णसेवेचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना अधिक प्रभावी, दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध मुद्द्यांवर सकारात्मक संवाद साधण्यात आला.
यावेळी सेवा सुविधा, कर्मचारी व्यवस्थापन आणि आरोग्य केंद्राच्या एकूण कार्यक्षमतेबाबत महत्त्वपूर्ण ठरावांना मंजुरी देण्यात आली. स्थानिक स्तरावर आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या सभेला सहअध्यक्ष तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, सचिव डॉ. ऋषिकेश डोके, गणपतीपुळेच्या माजी सरपंच कल्पना पकये, भगवतीनगरच्या सरपंच प्रगती भोसले, तसेच समिती सदस्य कल्पेश सुर्वे, दीपक दुर्गवळी, श्रीकांत राजवाडकर, अमित पाटील, बावा हळदणकर, प्रकाश कदम, आर्या पेडणेकर, मुख्य सेविका संपदा भागवत, स्वानंदी पवार, पत्रकार वैभव पवार, आरोग्य सहाय्यक संजय बारिंगे आणि इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी केले. जन आरोग्य समितीच्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधी व आरोग्य विभाग यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होऊन भविष्यात नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

