(पुणे)
पुण्यातील डेक्कन परिसरातील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हे नावाजलेले हॉस्पिटल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणामुळे या रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी सुरू आहे. चौकशी अहवाल येईपर्यंत सह्याद्री रुग्णालयाचा लिव्हर ट्रान्सप्लांट परवाना स्थगित करण्याचे निर्देश पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी दिले आहेत.
१५ ऑगस्ट रोजी बापू कोमकर (वय ४८, रा. हडपसर) यांच्यावर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्यांच्या उपचारासाठी पत्नी कामिनी (वय ४२) यांनी यकृताचा तुकडा दान केला होता. मात्र, शस्त्रक्रियेनंतर बापू कोमकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांत कामिनी यांचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोग्य उपसंचालक कार्यालयाने रुग्णालयाला नोटीस बजावून कागदपत्रांची मागणी केली. त्यानंतर राज्य आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीत उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून चार आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे ठरवण्यात आले. तोपर्यंत सह्याद्री हॉस्पिटलचा यकृत प्रत्यारोपण परवाना स्थगित ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानेही रुग्णालयाला २४ तासांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रुग्णालयाने मंगळवारी अहवाल सादर केला असून, त्यावरून पुढील कारवाई होणार आहे.
सह्याद्री रुग्णालयाने अधिकृत निवेदन जारी करत सांगितले की, “आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आमचा जिवंत दाता यकृत प्रत्यारोपण परवाना तात्पुरता स्थगित ठेवला आहे. मात्र, आमच्या इतर सर्व रुग्णालयीन सेवा, ज्यामध्ये इतर प्रत्यारोपण व शस्त्रक्रिया आहेत, त्या नेहमीप्रमाणे सुरू राहतील.”

