(पीटीआय/नवी दिल्ली)
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेपर्वाईने गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबीयांना विमा कंपनीकडून भरपाई मिळणार नाही, असा स्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे बेदरकार वाहनचालकांच्या बाबतीत विमा कंपन्यांची जबाबदारी मर्यादित असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात कर्नाटकातील एन. एस. रविशा याने १८ जून २०१४ रोजी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत निष्काळजीपणे गाडी चालवली आणि अपघातात स्वतःचा मृत्यू ओढवून घेतला. त्यावेळी गाडीत त्याचे वडील, बहीण आणि तिची मुलेही प्रवास करत होते. रविशाच्या कुटुंबीयांनी या अपघातानंतर विमा कंपनीकडे ८० लाख रुपयांच्या भरपाईची मागणी केली होती. मात्र, ही मागणी कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली होती.
या आदेशाविरोधात वारसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. “स्वतःच्या निष्काळजीपणातून मृत्यू ओढवून घेतलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना भरपाई देणे, म्हणजे नियम तोडणाऱ्याला बक्षिस देण्यासारखे ठरेल,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या निर्णयामुळे वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, विमा कंपन्यांच्या जबाबदारीचे सीमांकनही स्पष्ट झाले आहे.