(रत्नागिरी /प्रतिनिधी)
तालुक्यातील निरुळ सडा परिसरात पायवाटेवर पडलेल्या अवस्थेत आढळलेल्या एका प्रौढाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनील गणपत चव्हाण (वय ५२, रा. नाखरे-बोरभाटले, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची माहिती त्यांच्या मुलाने पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील चव्हाण यांना मद्यपानाचे व्यसन होते. बुधवारी, २० मे रोजी सकाळी ते कोळंबे येथे कामासाठी गेले होते. सायंकाळपर्यंत ते घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नीने मुलाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुलाने वडिलांचा शोध सुरू केला.
सायंकाळच्या सुमारास निरुळ सडा येथील पायवाटेवर सुनील चव्हाण हे पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद पूर्णगड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.

