(रत्नागिरी / वार्ताहर)
कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासोबतच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आयोजित ‘कुणबी विद्यार्थी गुणगौरव सोहळा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखा, रत्नागिरी, कुणबी कर्मचारी सेवा संघ, रत्नागिरी आणि कुणबी समाज क्रांती संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ९ ऑगस्ट) कुणबी भवन, रत्नागिरी येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखेचे अध्यक्ष रामभाऊ गराटे होते. जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप व महेंद्र मांडवकर, रत्नागिरी पंचायत समितीचे उपसभापती गजानन धनावडे, जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कुणबी कर्मचारी सेवा संघाचे अध्यक्ष संतोष रावणंग, कुणबी समाज क्रांती संस्थेचे अध्यक्ष सलील डाफळे यांच्यासह शांताराम मालप, श्रीकांत मांडवकर, विनया गावडे, सागर कळंबटे, दिगंबर घवाळी, राजीव दरडी आदी मान्यवर उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सन्मान
सोहळ्यात आयडॉल शिक्षक समृद्धी गोणबरे, शिक्षण विस्तार अधिकारी महेश कांबळे, नवनियुक्त केंद्रप्रमुख संतोष गोताड, पांडुरंग गावडे, नितीन मोहिते, सुभाष कळंबटे आणि संजय सुवरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता दहावी, बारावी, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच विविध शैक्षणिक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरव करून सत्कार करण्यात आला.
मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाचा संदेश
उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, कठोर मेहनत आणि आत्मविश्वास या बाबी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले.
निलेश सांबरे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो, असेही त्यांनी नमूद केले.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचा गौरव करण्याबरोबरच शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, समाजबांधव आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बैकर, लीलाधर कुड आणि संतोष भुवड यांनी केले. विलास मांजरेकर यांनी रांगोळीच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळाचे सुशोभीकरण केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कुणबी कर्मचारी सेवा संघाचे कर्मचारी, आयोजक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या नियोजनातून हा गुणगौरव सोहळा उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.

