(गुहागर)
गणेशोत्सवानिमित्त उमराठ (कोंडवीवाडी) येथील कलाकार संदेश पांडुरंग गावणंग आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्वहस्ते एक आगळीवेगळी गणेश सजावट साकारली आहे. कोकण पर्यटनामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेल्या हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मी-गणेश मंदिर आणि परिसराची हुबेहुब प्रतिकृती उभारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
गावणंग कुटुंबीयांना पिढ्यान् पिढ्या कलेचा वारसा लाभला आहे. गेल्या वर्षी त्यांनी उमराठ आणि हेदवी गावांच्या ग्रामदेवता श्री नवलाई देवी मंदिराची प्रतिकृती सजावटीतून साकारून भक्तांच्या मनात श्रद्धा जागवली होती. यावर्षीही त्यांच्या कल्पकतेने आणि कलात्मकतेने सजावटीला धार्मिकतेची जोड मिळाली आहे.
“हेदवीचे दशभुज लक्ष्मी-गणेश मंदिर हे कोकण पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाचे स्थळ आहे. या सजावटीतून त्याची आणखी प्रसिद्धी व्हावी व धार्मिक भावना जपल्या जाव्यात हीच आमची भावना आहे,” असे गावणंग कुटुंबीयांनी सांगितले.
या आकर्षक आणि भावपूर्ण सजावटीला परिसरातील तसेच गुहागर तालुक्यातील अनेक गणेशभक्तांची गर्दी होत आहे. या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत असून गणेशभक्तांनी ही आगळीवेगळी आरास नक्की पाहावी, असे आवाहन उमराठ ग्रामपंचायतीचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी केले आहे.

