(गुहागर)
उपमुख्यमंत्री अजित पवार कोणताही वार, तिथी किंवा दिवस पाळत नाहीत. त्यांच्याकडे भोजनाचे आयोजन असते तेव्हा नेहमीच मांसाहार असतो. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने शिंदे गटातील मंत्र्यांनी भोजनास जाणे टाळले असावे, असा मिश्कील टोला शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांनी लगावला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनास केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच उपस्थित होते. मात्र, शिंदे गटातील एकही मंत्री उपस्थित नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित गट) आणि शिंदे गटामध्ये मतभेद आहेत का, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी गुहागर येथे पत्रकारांशी संवाद साधला.
मी स्वतः अजितदादांसोबत पंधरा वर्षे काम केले आहे. ते उत्तम आदरातिथ्य करणारे आहेत. मात्र त्यांच्या भोजनात मांसाहार नेहमीच असतो. सध्या श्रावण महिना सुरू आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात न आलेली असावी. त्यामुळेच बहुधा शिंदे गटातील मंत्री त्यांच्याकडे जाणे टाळत असावेत, असा मिश्कील टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, भास्कर जाधव यांची एक लेखनाची नोंद सध्या सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. त्यात त्यांनी पक्षत्याग करणाऱ्यांबद्दल भाष्य केले आहे. “जे आपल्याला सोडून गेले, त्यांच्याविषयी मी कधीच अपशब्द वापरत नाही. मात्र, जेव्हा माझ्याविषयी कुणी काही बोलते, तेव्हा मीही गप्प बसत नाही,” असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेलेले काही लोक आज इतरांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ते भावनेच्या आहारी गेलेले आहेत. चार जण गेले तरी चाळीस नव्यांना तयार करण्याची ताकद आपल्यात आहे, आणि ती ताकद आपण वेळ आल्यावर दाखवून देऊ, असे आत्मविश्वासपूर्ण विधानही जाधव यांनी यावेळी केले.