(गुहागर)
गुहागर – चिपळूण महामार्गावर सोमवार (१५ सप्टेंबर) रात्री मार्गताम्हाणे येथील समर्थ नर्सरी उताराजवळ दोन कारची भीषण टक्कर झाली. रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जाते.
गुहागरकडून चिपळूणकडे जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या ईरटीका वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, त्यापैकी एक वाहन रस्त्याच्या कडेला कोसळले. धडकेचा जोर इतका होता की अपघातस्थळी लावलेले बॅरिकेटसुद्धा उडाले.
या भागातील रखडलेल्या मार्गकामामुळे आणि मोठ्या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांत संतप्त नाराजी पसरली आहे. मार्गताम्हाणे परिसरातील कामे तातडीने पूर्ण करून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा अधिक मोठी जीवितहानी होऊ शकते, असा इशारा स्थानिकांनी प्रशासनाला दिला आहे.

