(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील मुख्य बाजारपेठेमध्ये आज सोमवारी १ सप्टेंबर रोजी भगवतीनगरचे समाजसेवक कै. पांडुरंग तथा आप्पा भोसले यांच्या नामकरण फलकाचे अनावरण गावातील यशस्वी उद्योजक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवीशेठ राजवाडकर यांचे हस्ते आणि भगवतीनगरच्या सरपंच प्रगती भोसले यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कै. पांडुरंग उर्फ आप्पा भोसले यांनी स्वातंत्र्योत्तर काळानंतर अनेक वर्षे सरपंच पद भूषवले होते. सुमारे तीन चार दशके ते ग्रामपंचायत सदस्य होते. या कार्यकाळात त्यांनी गावच्या विकासासाठी अहोरात्र कार्य केले.पूर्वी निवेंडी भगवतीनगर हा एकच गाव असताना प्रत्येक वाड्या वस्त्यांवर रस्ते व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आप्पांचे खूप मोठे योगदान आहे.त्यांच्या प्रयत्नांमुळे ४०/५० वर्षांपूर्वी पासून गावात …एक गाव एक स्मशान भूमी हा एक महत्वाचा सामाजिक बदल घडवणारा उपक्रम सुरू करण्यात आला. आप्पांच्या या कार्याचे स्मरण व गौरव म्हणून गावातील मध्यवर्ती ठिकाणी त्यांच्या नावाचा फलक लावण्यात आला आहे.
हा नामकरण फलक कायमस्वरूपी स्लॅबच्या स्वरूपात तयार करण्यासाठी भगवतीनगर गावचे सुपुत्र तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवी शेठ राजवाडकर यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने फलक उभारून देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. या समारंभास गावच्या सरपंच सौ.प्रगती भोसले मॅडम, श्री.शंकर आंबेकर सर,उद्योजक श्री.सतीश सोबळकर, आप्पांचे सुपुत्र प्रकाशभाऊ भोसले, माजी ग्रा. पं.सदस्य प्रमोद भोसले, व्यवसायिक वैभव घाग, शेखर सावंत, सुनील वाडकर, राजकुमार जाधव, सदानंद डिंगणकर ,प्रकाश निवेंडकर, विद्याधर डिंगणकर, सुधीर जाधव, वसंत घाणेकर आणि गावातील अन्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन व आप्पांच्या कार्याची गौरवपर माहिती व उपस्थितांचे आभार श्री.नंदकुमार यादव यांनी मानले.

