(रत्नागिरी)
शहरालगतच्या कारवांचीवाडी येथे रविवारी सकाळी सुमारे आठच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला. मिर्या–नागपूर हायवेच्या कामासाठी धावणारा डंपर अचानक बेकाबू होऊन थेट एका घराच्या आवारात घुसला. या घटनेत रिक्षा, दुचाकी, घरासमोरील शेड, विहीर तसेच पाण्याचा मोटार पंप यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हा डंपर रस्त्याच्या कामावरील ठेकेदाराचा होता व चालक कारवांचीवाडी स्टॉपजवळ चहा पिण्यासाठी टपरीवर गेला होता. त्या वेळी डंपर न्यूट्रल गिअरमध्ये असल्याने उताराच्या दिशेने हळूहळू सरकू लागला. काही क्षणांतच वेग वाढल्याने डंपरने रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका रिक्षाला जोरदार धडक दिली आणि पुढे जाऊन गितेश तांडेल यांच्या घराच्या आवारात घुसला.
या धडकेत रिक्षा आणि एक दुचाकी गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाली. घरासमोरील शेडचे पत्रे व लोखंडी संरचना वाकल्या असून आवारातील विहिरीच्या कडेला तडा गेला आहे. पाण्याचा मोटार पंप पूर्णपणे निकामी झाला आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. ठेकेदार व वाहनचालकाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत असून, अशा निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना टळल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घटनेची पुढील चौकशी पोलीस करत असून, झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.

