(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू आणि परिसरातील प्रागैतिहासिक काळातील कातळशिल्पे व रेखाचित्रे या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचा अमूल्य भाग आहेत. याच वारशाच्या जतनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व विभागासह राज्य शासनाला कडक आदेश दिले आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या या कलेचा वारसा अबाधित राहावा, यासाठी आता कायदेशीर पाठबळ मिळाले आहे.
राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातील बारसू, देवाचेगोठणे, कशेळी, सोलगाव, धोपेश्वर, देवीहसोळ, जांभरूण, उक्षी आदी ठिकाणी सापडलेली कातळशिल्पे सुमारे २० हजार वर्षे जुनी असून, ती अश्मयुगीन मानवाच्या सर्जनशीलतेचे जिवंत पुरावे मानली जातात. यात प्राण्यांचे चित्रण, भौमितिक रचना, मानवी आकृती, दिशा-चिन्हे आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रतीक यांचा समावेश आहे. बारसू परिसरात होणाऱ्या संभाव्य औद्योगिक प्रकल्पांमुळे या ऐतिहासिक कलेच्या वारशावर धोका निर्माण होऊ शकतो, या भीतीने गणपत राऊत, रामचंद्र शेळके आणि महेंद्रकुमार गुरव यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी युनेस्कोच्या यादीतील रेखाचित्रांचे व शिल्पांचे संरक्षण, देखभाल आणि त्यासाठी स्वतंत्र संरक्षित क्षेत्र जाहीर करण्याची मागणी केली होती.
मुख्य न्यायाधीश आलोक अराध्य भाराच्ये आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने ही याचिका निकालात काढताना स्पष्ट आदेश दिले की, “भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने केवळ अस्तित्वात असलेल्या कातळशिल्पांचे नव्हे, तर नव्याने सापडणाऱ्या शिल्पांचेही संवर्धन, देखभाल व व्यवस्थापन करावे.” तसेच, या कामासाठी मिळालेला निधी केवळ या कलेच्या रक्षणासाठी वापरण्यात यावा आणि याचिकाकर्त्यांच्या सूचना गांभीर्याने ऐकाव्यात, असेही आदेश देण्यात आले.
निसर्ग आणि इतिहासाचा संगम
बारसू, गोवळ, देवाचेगोठणे परिसरातील ६० चौ. किमी क्षेत्रफळावर पसरलेल्या कातळशिल्प सड्यावर विविध वैशिष्ट्यपूर्ण चित्रे सापडतात. निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि डॉ. सुरेंद्र ठाकूर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या शिल्पांचा शोध लागला. या संशोधकांच्या मते, ही चित्रे केवळ पुरातत्त्वीय वस्तू नसून, मानवाच्या सुरुवातीच्या वैचारिक आणि सांस्कृतिक प्रवाहाची साक्ष देणारे अत्यंत मौल्यवान दस्तऐवज आहेत.
संवर्धनाची नितांत गरज
कोकणात यापूर्वी सापडलेली लेणी, मंदिरे आणि शिल्प यांच्याशी साधर्म्य असणारी ही कातळ चित्रे आंतरराष्ट्रीय महत्त्वाची असून, पुढील पिढ्यांपर्यंत हा ठेवा सुरक्षित राहावा यासाठी शासन, स्थानिक यंत्रणा व नागरिक यांची संयुक्त जबाबदारी आहे. बारसूतील कातळशिल्प परिसराचा विकास पर्यटक स्थळ म्हणून होण्याची शक्यता असून, यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकते. मात्र त्यासाठी संवेदनशीलतेने पावले उचलणे आवश्यक आहे.

