( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
मिरजोळे येथील २५ वर्षीय भक्ती मयेकर हिच्या खूनप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी तिच्या प्रियकरासह त्याचे दोन साथीदारांना अटक केली आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अटक केलेल्यांत प्रियकर दुर्वास दर्शन पाटील (२५, रा. जंगमवाडी-वाटद खंडाळा), बार मॅनेजर विश्वास विजय पवार (४१, रा. कळझोंडी-बौद्धवाडी) आणि कारचालक सुशांत शांताराम नरळकर (४०, रा. आदर्शनगर, वाटद-खंडाळा) यांचा समावेश आहे. या प्रकरणी भक्तीचा भाऊ हेमंत मयेकर याने पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली होती.
भक्तीने प्रियकर दुर्वासवर लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र दुर्वास पाटीलने तिच्याशी ब्रेकअप करून दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवले होते. आपले ठरलेले लग्न मोडेल या भीतीने प्रियकराने थरकाप उडवणारा कट रचला. १६ ऑगस्ट रोजी त्याने भक्तीला खंडाळा येथील एका बारमध्ये बोलावून घेतले. तेथे केबल वायरने तिचा गळा आवळून निर्घृण खून केला.
खूनानंतर विश्वास पवार आणि सुशांत नरळकर यांच्या मदतीने मृतदेह कारमधून आंबा घाटात नेऊन टाकण्यात आला. दरम्यान भक्ती बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. दुर्वासला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार आंबा घाटात शोधमोहीम राबवण्यात आली आणि भक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना मिळून आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०३ (१), २३८, ६१ (२), १३८, १२७ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर न्यायालयाने तिघांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या घटनेमुळे रत्नागिरीत खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं ते पाहा या व्हिडीओतून…

