(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरीजवळील समुद्रात बुधवारी सकाळी एका मच्छीमाराने चालत्या बोटीतून अचानक समुद्रात घेतलेल्या उडीमुळे खळबळ उडाली. लांजा तालुक्यातील भडे पिंपळवाडी येथील विनायक बाळकृष्ण दळवी (वय ३८) यांनी अचानक टोकाचे पाऊल उचलल्याची घटना १० डिसेंबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दळवी गेली चार वर्षे मिरकरवाडा येथील रफीक उर्फ पप्पू यांच्या मासेमारी बोटीवर काम करीत होते. त्या दिवशीही बोट नियमित मासेमारीसाठी समुद्रात असताना विनायक दळवी यांनी काहीही पूर्वसूचना न देता अचानक पाण्यात उडी मारली. सहकाऱ्यांना काही कळण्याआधीच ते समुद्रात अदृश्य झाले. या घटनेची माहिती मिळताच बोटीचे मालक रफीक यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र समुद्रातील वादळी परिस्थिती आणि खोल पाण्याचा पसारा यामुळे शोधकार्य अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. दळवी यांनी इतका अतिशय टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
या घटनेची नोंद मिरकरवाडा पोलिस चौकीत करण्यात आली असून पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. शहर पोलिस स्थानकाच्याही विविध पथकांनी समुद्रपट्टीवर आणि किनारी भागात शोधमोहिम सुरू केली आहे.समुद्रात बेपत्ता झालेल्या दळवींचा शोध युद्धपातळीवर सुरू असून स्थानिक मच्छीमार, किनारपट्टी सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस यांचे संयुक्त पथक त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

