(रत्नागिरी / प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलिसांनी अश्लील शिवीगाळ प्रकरणात अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करून आणि केवळ २३ दिवसांत आरोपीला शिक्षा सुनावण्यात यश मिळवले आहे. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे पीडित महिलेला तात्काळ न्याय मिळाला असून, जिल्ह्यात या कामगिरीचे कौतुक होत आहे.
ही घटना १९ जून २०२५ रोजी सकाळी अकराच्या सुमारास गुळेकरवाडी, सावर्डे येथे घडली. फिर्यादी महिला आपल्या घराच्या अंगणात कचरा साफ करत असताना, त्याच गावातील रहिवासी असलेल्या सचिन मारुती गुळेकर (वय ३५) याने मद्यधुंद अवस्थेत घटनास्थळी येत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या प्रकारामुळे महिलेला मानसिक त्रास झाला. त्यांनी तात्काळ सावर्डे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे १९ जून रोजीच दुपारी १.३५ वाजता भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. प्रकरणाचा तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पी.एल. चव्हाण आणि महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल आर.पी. मेश्राम यांनी जलदगतीने पूर्ण केला. तपास पूर्ण करत अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
फास्ट ट्रॅकवर सुनावणी होण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे विशेष विनंती केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत साक्षीदारांचे वेळेत परीक्षण केले. पुरावे आणि साक्षींच्या आधारे मा. न्यायदंडाधिकारी वर्ग १ केदार पोवार (चिपळूण) यांनी आरोपीस दोषी ठरवले. न्यायालयाने भारतीय न्याय संहिता कलम ७९, ३५२ आणि २९६ अंतर्गत प्रत्येकी एका महिन्याचा साधा कारावास आणि प्रत्येकी १००० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास प्रत्येकी १५ दिवसांची साधी कैद ठोठावण्यात आली आहे.
या खटल्यात सरकारी वकील म्हणून श्रीमती तृष्णा तळेकर यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक आबासो पाटील, पोलीस उपनिरीक्षक पी.एल. चव्हाण, पोहेकॉ बी.एस. कोळेकर, मपोहेकॉ आर.पी. मेश्राम आणि पोहेकॉ एम.एम. कांबळे यांचा समावेश होता.