( रत्नागिरी )
कोकण किनारपट्टीवरील तीन महिन्यांच्या मच्छिमारी बंदीनंतर अखेर आज १ सप्टेंबरपासून पर्सनेट मच्छिमारीला सुरुवात झाली आहे. पारंपरिक मच्छिमारीला १ ऑगस्टपासून परवानगी मिळाली होती, मात्र पर्सनेट व फिशिंग ट्रॉलर यांना सप्टेंबरची प्रतीक्षा करावी लागली होती. ती आता संपली असून, मोठ्या नौका समुद्रावर झेपावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे खवय्यांना आता मोठ्या प्रमाणात ताजी मच्छी उपलब्ध होणार आहे.
मागील महिनाभर समुद्राला उधाण, प्रचंड लाटा, पाऊस व वारा अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना मच्छीमारांना करावा लागला. याच परिस्थितीत नवा हंगाम सुरू होत असून, समुद्रातील करंट, वाऱ्याचा वेग आणि वातावरणाचा अंदाज घेऊन मच्छीमार समुद्रात उतरण्यास सिद्ध झाले आहेत.
मिरकरवडा बंदरात लाखोंची उलाढाल
रत्नागिरीतील मिरकरवडा बंदर जेटीवर दररोज मच्छी व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. पर्सनेट, फिशिंग ट्रॉलर, यांत्रिक व बिगरयांत्रिक होड्या अशा सर्व प्रकारच्या नौका मासेमारीत सहभागी होतात. वर्षाला १०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल या व्यवसायातून होते. नव्या हंगामासाठी खलाशीही मोठ्या संख्येने बंदरावर दाखल झाले असून, बाजारपेठा पुन्हा गजबजू लागल्या आहेत.
मच्छिमार बांधव सज्ज
शासकीय नियमानुसार १ जून ते ३१ जुलै हा ६१ दिवसांचा मच्छिमारी बंदी कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर १ ऑगस्टपासून पारंपरिक मच्छिमारी, तर १ सप्टेंबरपासून पर्सनेट मच्छिमारी सुरू होते. हर्णे, जयगड, रत्नागिरी, साखरीनाटे यासारख्या किनारपट्टीवरील सुमारे ५० बंदरांवर मच्छिमारीची उलाढाल होत असून, जिल्ह्यातील हजारो कुटुंबे थेट व अप्रत्यक्षपणे या व्यवसायावर अवलंबून आहेत. याशिवाय परराज्यातील खलाशीही मोठ्या संख्येने या भागात दाखल झाले आहेत.

