(नवी दिल्ली)
एक्सप्रेस वे आणि महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना टोल नाक्यांवर काही वेळ थांबावे लागते. याच दरम्यान, टोल कर्मचाऱ्यांची अरेरावी, उद्धट वर्तन आणि उद्धट बोलण्याच्या तक्रारी वाहनचालक वारंवार करत असतात. ही समस्या ओळखून नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यानुसार आता टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना विनम्र आणि सौजन्यपूर्ण वागणुकीचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तक्रारींचा पाऊस, NHAI चे पाऊल पुढे
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरात सुमारे १.५ लाख किलोमीटर लांबीचे नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस वेचे जाळे आहे. यापैकी सुमारे ४५ हजार किलोमीटर रस्त्यांवर टोल वसूल केला जातो. त्यासाठी १०६३ टोल नाके उभारण्यात आले आहेत. यापैकी ७०० टोल नाके थेट NHAIच्या अखत्यारित आहेत, तर उर्वरित टोल नाके बीओटी (Build-Operate-Transfer) तत्वावर चालवले जातात.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, टोल नाक्यांवरील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. बहुतांश तक्रारी टोल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वाहनचालकांकडून असतात, ज्यामुळे अनेक वेळा वाद निर्माण होतो. हे वाद टाळण्यासाठी आणि टोल अनुभव अधिक सौहार्दपूर्ण करण्यासाठी NHAIने प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.
कशी दिली जाणार ट्रेनिंग?
या प्रशिक्षण कार्यक्रमात NHAI अधिकारी, काउंसलर आणि मनोवैज्ञानिक कर्मचारी सहभागी होणार आहेत. प्रशिक्षणादरम्यान, कर्मचाऱ्यांना खालील गोष्टी शिकवण्यात येणार आहेत:
-
वाहनचालकाशी विनम्र, संयत आणि आदरयुक्त वर्तन कसे करावे
-
संवाद साधताना शारीरिक हावभाव आणि दृष्टीसंवाद कसा असावा
-
कोणत्या परिस्थितीत वाहनचालक चिडू शकतो याची मानसिक तयारी
-
विविध प्रकारच्या वाहनचालकांशी परिस्थितीनुसार संवादाची पद्धत बदलणे
उदाहरणार्थ, ट्रकचालक आणि कारचालक यांच्याशी संवाद साधताना एकसारखी भाषा वापरता येणार नाही, कारण दोघांचे मानसिक व सामाजिक स्तर वेगवेगळे असतात. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना या बाबतीत सुसंगत आणि समजूतदार प्रशिक्षण दिले जाणार आहे.
टोलचं झंझटही होणार मिटणार?
याशिवाय सरकार आगामी काळात टोल संकलन प्रणाली अधिक डिजिटल आणि पारदर्शक करण्यासाठी योजना आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भविष्यात टोल वसुलीचं झंझट कमी होण्याची शक्यता आहे. एकंदरीत, NHAIचा हा निर्णय वाहनचालक आणि टोल कर्मचाऱ्यांमधील तणाव कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सकारात्मक आणि सुकर होईल, अशी अपेक्षा आहे.