(रायगड)
मागील दोन-तीन महिन्यांपासून मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरु असून, सुकेळी खिंडीजवळील खैरवाडी गावाच्या समोर असलेले अत्यंत धोकादायक वळण पुन्हा एकदा अपघातग्रस्त ठरले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर प्रचंड वाहतूक असताना, रविवार, ३१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास एक कंटेनर रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाला. या अपघातात कंटेनर चालक घनशाम चंद्रप्रकाश तिवारी (वय २९, रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) गंभीर जखमी झाला आहे.
रसायनाने भरलेला कंटेनर दुभाजकावर धडकून रस्त्यावर उलटला
प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ४८ ए.जी. ८०७० क्रमांकाचा कंटेनर महाड बाजूकडून पनवेलच्या दिशेने जात असताना, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी थेट दुभाजकावर आदळून रस्त्याच्या मध्यभागी उलटली. कंटेनरमध्ये रसायन भरलेले असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर होती. घटनास्थळी दुसरे कोणतेही वाहन नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली आणि गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला.
पोलिस आणि प्रशासनाची तत्काळ कारवाई
अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, तसेच वाकण टोल नाक्यावरील कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने कंटेनर हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. सदर ठिकाणी मागील ४ महिन्यांत जवळपास २० अपघात झाले आहेत, तरीही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. हा अपघात पुन्हा एकदा याच ठिकाणच्या असुरक्षिततेकडे लक्ष वेधतो. धोकादायक वळणावर प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवणे आवश्यक असून, यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे.

