( गांधीनगर )
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री पटेल यांनी सर्व मंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलावले असून, नव्या मंत्र्यांचा शपथविधी समारंभ उद्या (१७ ऑक्टोबर) सकाळी गांधीनगर येथील महात्मा मंदिरात पार पडणार आहे. या सोहळ्याला भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
मंत्रिमंडळाचा पूर्ण फेरबदल; संकेत मोठ्या बदलांचे
सध्याच्या गुजरात मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह एकूण १७ मंत्री आहेत, ज्यात आठ कॅबिनेट आणि आठ राज्यमंत्री आहेत. सर्व आमदारांना व मंत्र्यांना दोन दिवस गांधीनगरमध्येच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या नव्या चेहऱ्यांना फोनद्वारे कळविण्यात आले आहे. दरम्यान, सर्व राजीनामे राज्यपाल देवव्रत आचार्य यांच्याकडे सादर केले जाणार असून, नव्या मंत्र्यांची यादीही राज्यपालांना देण्यात येईल.
भाजप हायकमांडची सक्रियता; नड्डा, शाह आणि बन्सल यांची उपस्थिती
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उद्या (शुक्रवारी) सकाळी गुजरातमध्ये दाखल होणार आहेत, तर राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील बन्सल आजच गांधीनगरला पोहोचणार आहेत. सहसा मंत्रिमंडळ विस्तारावेळी इतक्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती नसते, त्यामुळे या फेरबदलातून मोठे राजकीय बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.
काँग्रेसमधून आलेल्या चेहऱ्यांना मिळणार मंत्रिपद?
नव्या मंत्रिमंडळात अर्जुन मोढवाडिया, अल्पेश ठाकोर, सी. जे. चावडा आणि हार्दिक पटेल यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. तसेच सौराष्ट्रातील जयेश राडाडिया व जितू वाघानी यांचाही मंत्रिपदासाठीचा दावा जवळजवळ निश्चित मानला जातो. या फेरबदलात उत्तर गुजरातमधील पाटीदार व ठाकोर समाजाला अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम सोलंकी, पंचायत मंत्री बच्चूभाई खबर, वनमंत्री मुकेश पटेल, नागरी पुरवठा मंत्री भिखुसिंह परमार आणि आदिवासी विकास मंत्री कुंवरजी हलपती यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाऊ शकतो.
तीन वर्षांनंतर पहिला मोठा फेरबदल – निवडणुकीची तयारी?
भूपेंद्र पटेल २०२२ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यापासून मंत्रिमंडळात कोणताही बदल झाला नव्हता. आगामी २०२७ च्या निवडणुकांच्या तयारीसाठी हा फेरबदल करण्यात येत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. विसावदर पोटनिवडणुकीतील भाजपचा अनपेक्षित पराभव आणि अपेक्षाभंग करणारे मंत्री हेही बदलाचे मुख्य कारण मानले जात आहे.
जुन्या दिग्गजांना पुनरागमनाची संधी
भाजप हायकमांडने यावेळी जुन्या व अनुभवी नेत्यांना पुनश्च संधी देण्याची तयारी सुरू केली आहे. काही काळ बाजूला ठेवलेले परंतु संघटनेत मजबूत पकड असलेले दिग्गज नेते नव्या जबाबदाऱ्या स्वीकारतील, अशी शक्यता वर्तवली जाते.
सत्ताविरोधी लाट आणि स्थैर्याचा प्रश्न
गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळापासून सत्तांतराच्या हालचाली सतत दिसत आहेत. आनंदीबेन पटेल, विजय रुपाणी यांचे अचानक राजीनामे आणि आता भूपेंद्र पटेल सरकारमधील मोठा फेरबदल, या सर्व घटनांनी सत्ताविरोधी लाट तीव्र होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

