(मुंबई)
महाराष्ट्राची गौरवगाथा विषद करणारे ‘गौरवशाली महाराष्ट्र दर्शन’ या चित्रप्रदर्शनाचे मंत्रालयात उद्या (सोमवार) सकाळी ११ वाजता उद्गाटन होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह वरिष्ठ मंत्री, अधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
गौरवशाली महाराष्ट्राच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने दिनांक १ ते ४ मे दरम्यान ऐतिहासिक अशा जांबोरी मैदानावर महाराष्ट्राची यशोगाथा विषद करणारा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५ चे आयोजन केले होते. या महोत्सवात महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा सांगणारे भव्य असे पाच विविध दालनांचे चित्रप्रदर्शन आयोजित केले होते. यामध्ये महाराष्ट्राचे विचारसूत्र, महाराष्ट्र धर्म, गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्र रत्न आणि आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्याच्या कामगिरीचा आढावा घेणारी चित्रप्रदर्शन प्रदर्शित करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महोत्सवात सहभागी होताना या चित्रप्रदर्शनांच्या पाचही दालनांची पाहणी केली केल्यानंतर असेच प्रदर्शन मंत्रालयात आयोजित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार उद्यापासून पुढील तीन दिवस महाराष्ट्राची गौरवगाथा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास सांगणारे हे प्रदर्शन मंत्रालयात मंत्री, अधिकारी व प्रेक्षकांसाठी खुले राहणार आहे. महाराष्ट्राची विचारधारा, संतपरंपरेचा संदेश, महापुरूषांचे योगदान, भारतरत्न लाभलेल्या दिग्गज मराठी व्यक्तींचे कार्य आणि ६५ वर्षात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहून योगदान दिलेल्या सर्व मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी माहिती या एकाच प्रदर्शनात उपलब्ध होणार आहे. नव्या पिढीला महाराष्ट्राची गौरवगाथा समजावी या हेतूने एकाच छत्राखाली समग्र महाराष्ट्राचा इतिहास सांगण्याचा हा प्रयत्न असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५ ” या कार्यक्रमातंर्गत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे दिनांक २२ मे रोजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या कराड येथील समाधीस्थळावर जाऊन नतमस्तक होणार आहेत. तर दिनांक २३ मे रोजी सकाळी किल्ले रायगड येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून महाड येथील चवदार तळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता कांदे मैदान, महाड येथे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५ चा सांस्कृतिक सोहळ्याच्या कार्यक्रमाने सांगता समारंभ पार पडणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे उपस्थित होते.