(मुंबई)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचा काल तिसरा दिवस असून, त्यांनी आता लढ्याला अधिक तीव्र वळण देणार असल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, आजपासून (सोमवारपासून) पाणी पिणंही थांबवणार असून, प्राणांतिक उपोषण सुरू करणार आहे. आरक्षण मिळेपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही. प्रशासनाने सोमवारी आझाद मैदानावर आंदोलन सुरू ठेवण्याची अधिकृत परवानगी दिली आहे.
दरम्यान, दिवसभरात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपोषणस्थळी भेट देत मनोज जरांगेंना पाठिंबा दिला. समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शिवसेना (UBT) चे वसंत मोरे, आमदार कैलास पाटील, अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगेंची भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दर्शवला.
उपोषणस्थळी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शनही घडले. विविध मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी व नेत्यांनी भेट दिली आणि आंदोलनाला समर्थन दिलं. बीडमधील मंगेश गोकुळे या मनोज जरांगेंच्या प्रतिरूपासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. काही मुस्लिम भगिनींनी त्यांच्या सोबत छायाचित्रेही काढली.
नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जरांगेंनी सांगितले, “चिंचुंद्रीचं बोलणं मनावर घेत नाही. त्याला आम्ही याआधीही तोंड आवरण्यास सांगितलं होतं. आंदोलन संपल्यावर यावर लक्ष देऊ. राजकारणी नासके असतात. दोन वर्ष अंतरवलीमध्ये आम्ही समजावून सांगत होतो. पण आता आरक्षण मिळवायचंच आहे, आणि ते फक्त ओबीसीमधूनच मिळालं पाहिजे.”
त्यांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आणि गाड्या मुंबईबाहेर पार्क करण्यास सांगितलं. प्रशासनालाही सहकार्य करण्याचं आवाहन करत ते म्हणाले, “वानखेडे स्टेडियमजवळ गाड्या पार्क करण्यासाठी जागा द्या, त्यामुळे कोणत्याही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.” सरकारला थेट इशारा देताना जरांगेंनी सांगितलं, “या आठवड्यात जर तोडगा निघाला नाही, तर पुढच्या शनिवार आणि रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही. मुंबईमध्ये प्रत्येक १००-२०० मीटरवर चालणं अशक्य होईल.”
आरक्षणाच्या निकषांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं, “मराठवाड्यातील मराठा समाजाची कुणबी म्हणून नोंदी तालुका आणि जिल्हानिहाय आहेत. आमची मागणी नियमबद्ध आहे. आरक्षण मिळालेल्या आणि आता सधन झालेल्या जातींचा सर्वे होऊन, सधनांना आरक्षणातून वगळावं. आम्ही मरण पत्करू, पण मागे हटणार नाही. हे उपोषण केवळ प्रतीकात्मक नाही, तर आरक्षण मिळाल्याशिवाय संपणार नाही.” दरम्यान, त्यांनी आरक्षण तज्ञ, अभ्यासक आणि वकिलांशीही सविस्तर चर्चा केली. यावेळी सातारा आणि हैदराबाद गॅझेटियरमधील ऐतिहासिक नोंदींचा अभ्यास करण्यात आला. या नोंदींनुसार मराठा हेच कुणबी असल्याचा दावा अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी केला.
कायदेशीर प्रक्रिया टाळून कार्यवाही करता येणार नाही – मुख्यमंत्री
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंदोलनावर सकारात्मक भूमिका घेत संविधानाच्या चौकटीत राहून मराठा आरक्षणाचा तोडगा काढू, असं आश्वासन दिलं. फडणवीस म्हणाले, संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे यांना माहिती दिली. प्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. याबाबत शेवटी चर्चेतून मार्ग निघू शकतो. परंतु, आडमुठ्या भूमिकेतून तोडगा निघणार नाही. सरकार हे कायद्याने चालते. सरकार कायदेशीर मार्गाने सर्व प्रश्न सोडवेल. कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांचा वापर करून आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

