(रायगड / म्हसळा)
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात सोमवारी संध्याकाळी कणघर गावाजवळ एक भीषण अपघात घडला. पॅसेंजर रिक्षा अनियंत्रित होऊन सिमेंटच्या भिंतीवर आदळल्याने झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व अपघातग्रस्त स्थानिक कुणबी समाजाच्या बैठकीवरून परतत असताना ही घटना घडली.
अपघातग्रस्त रिक्षा (क्रमांक MH-06-AL-8331) संतोष नाना सावंत (वय ३८) यांच्या ताब्यात होती. रिक्षा कणघर गावाकडे परतत असताना कासारमलाई टी फाट्याजवळील तीव्र उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली रिक्षा थेट सिमेंटच्या कठड्यावर आदळली. अपघात इतका भीषण होता की चालकासह दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इतरांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये संतोष नाना सावंत (वय ३८), शांताराम पांडुरंग धोकटे (वय ७४) आणि शामा तुकाराम धोकटे (वय ५५) यांचा समावेश आहे. हे तिघेही घटनेच्या ठिकाणीच प्राण सोडले.
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये संजना संतोष मगर (वय ३७), प्रभाकर पांडुरंग धाडवे (वय ७३), संतोष रामचंद्र मगर (वय ३८) आणि पांडुरंग रामचंद्र धोकटे (वय ५०) यांचा समावेश आहे. पांडुरंग धोकटे यांनी या घटनेची फिर्याद दिली असून, सर्व जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

