(चिपळूण)
गणपती सणानिमित्त मुंबईहून गावी आलेल्या महेश विष्णू कदम (वय ३५, रा. तळसर, कदमवाडी) यांचा दुपारी विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
महेश दोन दिवसांपूर्वीच गावी आला होता. दुपारी अडीचच्या सुमारास वस्तीतील मुलांसोबत विहिरीत पोहण्यासाठी गेला असता ही दुर्घटना घडली. काही वेळ तो पोहत होता, दोन-तीनदा उडी मारल्यानंतर मात्र तो वर आला नाही.
घटना लक्षात येताच त्याचा भाऊ योगेश कदम यांनी धाव घेतली. मात्र विहीर खोल असल्याने शोधकार्य अडचणीत आले. बराच वेळ प्रयत्नांनंतर गळ टाकून महेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
महेश कदम यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण तळसरमध्ये घेतले होते. गेल्या आठ वर्षांपासून ते बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ वैभव (सैनिक) आणि योगेश (शेतकरी) असा परिवार आहे.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. या घटनेने संपूर्ण कदमवाडीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

