(चिपळूण / प्रतिनिधी)
तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यंदा मतदारांनी केवळ उमेदवारांनाच नाही, तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेलाच आरसा दाखवला आहे. रिंगणात असलेल्या उमेदवारांविषयी नापसंती दर्शवत ‘नोटा’ला झालेल्या मतदानाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ९ जिल्हा परिषद गटांमध्ये तब्बल १,३६९ तर पंचायत समितीच्या १८ गणांत २,१२१ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला आहे.
तालुक्यातील निवडणुकीचा निकाल अत्यंत अटीतटीचा लागला. पंचायत समितीमध्ये कोणत्याही एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. १८ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ७ जागांसह आघाडीवर राहिली, तर शिंदेसेनेला ४, उद्धवसेनेला ४ आणि भाजपला ३ जागा मिळाल्या. परिणामी, सत्तास्थापनेच्या समीकरणात उद्धवसेनेची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, ‘नोटा’ला झालेल्या मतदानाने काही ठिकाणी निकालाचे गणितच बदलून टाकल्याचे चित्र दिसून आले. जिल्हा परिषदेसाठी वहाळ गटात सर्वाधिक २३६ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. पेढे गटात भाजपच्या दीप्ती महाडिक यांनी राष्ट्रवादीच्या सान्वी शिंदे यांचा केवळ १९१ मतांनी पराभव केला. महाडिक यांना ४,६२२, तर शिंदे यांना ४,४३१ मते मिळाली. या गटात ‘नोटा’ला पडलेली १५६ मते निकालाच्या संदर्भात लक्षवेधी ठरली आहेत.
पंचायत समितीच्या गणांतही ‘नोटा’चा प्रभाव जाणवला. पिंपळी खुर्द गणात सर्वाधिक मतदान ‘नोटा’ला झाले असले, तरी तेथील निकालावर त्याचा परिणाम झालेला नाही. मात्र, शिरगाव गणात ‘नोटा’मुळे समीकरणे ढवळून निघाल्याचे स्पष्ट झाले. येथे राष्ट्रवादीच्या स्नेहा साळवी यांनी भाजपच्या ॲड. नयना पवार यांचा १३५ मतांनी पराभव केला. साळवी यांना ३,३०५, तर पवार यांना ३,१७० मते मिळाली. या गणात ‘नोटा’ला पडलेली १६४ मते निकालाच्या संदर्भात चर्चेचा विषय ठरली आहेत.
एकूणच, चिपळूण तालुक्यातील मतदारांनी निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय पक्षांना स्पष्ट संदेश दिल्याचे दिसते. उमेदवारांविषयी वाढती नाराजी आणि पर्यायांच्या मर्यादा यामुळे ‘नोटा’चा पर्याय अधिक प्रभावी ठरत असल्याचे या निकालातून अधोरेखित झाले आहे. आगामी निवडणुकांसाठी हा कल राजकीय पक्षांसाठी आत्मपरीक्षणाची संधी ठरणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

