(चिपळूण)
गद्रे जुनिअर कॉलेजमध्ये मराठी प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. सौ. संगीता प्रमोद जोशी यांच्या “सन्माननीय व्यासपीठ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. १४ सप्टेंबर २०२५) चिपळूण येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
हा सोहळा ब्राह्मण सहाय्यक संघ, चिपळूण येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार असून, सुप्रसिद्ध वक्ते श्री. राजीव बर्वे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल. सोहळ्याच्या मुख्य अतिथी म्हणून अभिनेत्री, लेखिका व निवेदिका सौ. संपदा जोगळेकर-कुळकर्णी उपस्थित राहणार आहेत.
हा प्रकाशन सोहळा परशुराम एज्युकेशन सोसायटी, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय, आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूण यांच्या सहकार्याने पार पडणार आहे. यामुळे कार्यक्रमाची व्याप्ती आणि स्थानिक सांस्कृतिक व साहित्यिक समुदायातील सहभाग अधिक वाढणार आहे.
प्रा. संगीता जोशी यांनी आपल्या अध्यापनाबरोबरच दैनिक सागरमध्ये मुद्रितशोधक म्हणून काम केले आहे. स्वतः वक्तृत्व स्पर्धांमधून त्यांनी यश मिळवले असून, त्यांच्या दोन्ही मुलींनीही अनेक ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुलींना भाषण लिहून देणे, तयारीसाठी मार्गदर्शन करणे आणि त्या प्रक्रियेतून आलेल्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक लिहिले गेले आहे.
सांस्कृतिक, कला व साहित्य क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असलेल्या संगीता जोशी यांचे हे पहिले पुस्तक असून, त्यामुळे चिपळूणसह परिसरातील साहित्यप्रेमी आणि कला रसिकांमध्ये या सोहळ्याबाबत उत्सुकता आहे.
लेखिका प्रा. संगीता जोशी व त्यांच्या कुटुंबीयांनी “माझ्या या पहिल्याच पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला आपण सर्वांनी अगत्याने उपस्थित रहावे”, असे आवाहन केले आहे.

