(मुंबई)
शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी एकसंध वार्षिक वेळापत्रक जारी केले आहे. हे वेळापत्रक २६ ऑगस्ट रोजी प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी जाहीर केले असून, सर्व शाळा आणि शिक्षण विभागाच्या संबंधित कार्यालयांना याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हे वेळापत्रक केवळ अध्यापनापुरते मर्यादित नसून, त्यात शिक्षकांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांनाही समान महत्त्व देण्यात आले आहे. दररोज, आठवड्याभरात आणि महिन्याभरात कोणती कामे करायची याचे स्पष्ट नियोजन यामध्ये देण्यात आले असून, शिक्षकांनी यानुसार आपले कार्य नियोजित करावे, असे आदेशात नमूद आहे.
शिक्षकांच्या जबाबदाऱ्यांमध्ये काय समाविष्ट?
- विद्यार्थ्यांची प्रगती तपासणे आणि अप्रगत विद्यार्थ्यांना उपचारात्मक मार्गदर्शन देणे
- प्रशासकीय कामकाजात सक्रिय सहभाग, शाळेच्या स्वच्छतेपासून ते योजनेच्या अंमलबजावणीपर्यंत
- आनंददायी शनिवार सारख्या उपक्रमांचे आयोजन
- स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे
- शाळा दुरुस्ती, गुणपत्रक तयार करणे, तसेच वर्षाअखेरीस परीक्षा तयारी चाचण्या घेणे
एप्रिल महिन्यातील विशेष नियोजन:
एप्रिल महिन्यात दहावी आणि बारावीच्या गुणपत्रकांचे नियोजन, शाळांची देखभाल व दुरुस्ती, तसेच परीक्षा तयारी चाचण्या यांसाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कार्यालयीन पातळीवरही काटेकोर पालन आवश्यक
या वेळापत्रकाचे पालन केवळ शाळांपुरते मर्यादित नसून, तालुका, विभाग, जिल्हा व राज्यस्तरावरील शिक्षण विभागातील सर्व संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही याचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियोजनामुळे संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेचा कारभार अधिक संघटित, पारदर्शक आणि परिणामकारक होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नवीन वेळापत्रकामुळे शिक्षकांचे अध्यापन कार्य अधिक नियोजित होणार असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे. शाळांतील प्रशासकीय कामकाजाच्या अंमलबजावणीत सुसूत्रता येणार असून, शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

