(मुंबई)
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत बांधण्यात आलेल्या ५,२८५ सदनिका तसेच ओरोस (जि. सिंधुदुर्ग) आणि कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इच्छुक अर्जदारांना १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असून, सोडत ९ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
या सोडतीसाठी आतापर्यंत (२८ ऑगस्ट २०२५ दुपारी ४ वाजेपर्यंत) एकूण १,४९,९४८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी अनामत रकमेसह १,१६,५८३ अर्ज स्वीकृत झाले आहेत. आता १३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रकमेचा भरणा करता येईल. तर आरटीजीएस/एनईएफटीद्वारे भरण्यासाठी १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार पात्र मानले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २२ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. त्यानंतर अर्जदारांना २४ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजेपर्यंत ऑनलाईन दावे व हरकती नोंदविता येतील. पात्र अर्जदारांची अंतिम यादी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
या लॉटरीमध्ये उपलब्ध सदनिकांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे :
- २०% सर्वसमावेशक योजना : ५६५ सदनिका
- १५% एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना : ३,०२९ सदनिका
- म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (विखुरलेल्या सदनिका समाविष्ट) : १,६७७ सदनिका
- परवडणाऱ्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५०%) : ४१ सदनिका
- भूखंड विक्री (ओरोस, कुळगाव-बदलापूर) : ७७ भूखंड
सोडतीसंबंधी अर्ज भरताना तांत्रिक अडचणी आल्यास अर्जदारांनी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे. अर्ज फक्त म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करता येणार आहेत.

