(पुणे)
वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून अखेर आत्महत्या केली. हुंड्यासाठी तिचा छळ झाल्याचा आरोप कस्पटे कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी तिची सासू, नणंद आणि नवरा यांना अटक करण्यात आली होती. तर सासरा राजेंद्र हगवणे आणि मोठा दिर सुशील हगवणे हे फरार होते. दरम्यान, आज (शुक्रवार) पहाटे पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वैष्णवी हगवणे हुंडा बळी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अशातच आता मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून बावधन पोलिसांनी कारवाई केली आहे.
वैष्णवी हगवणे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी पती, सासू, नणंद, सासरा आणि दीर यांनी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे, जमीन खरेदीसाठी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर हा छळ सुरू झाला होता, असेही कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, फरार असताना हे आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. आज अखेर या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बावधन पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे स्वारगेट परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सतत ठिकाण बदलून पोलिसांपासून लपण्याचा प्रयत्न करत होते. तर अटकपूर्वीचा या दोघांचा जेवणाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आरोपींनी फरार काळात आरामात हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतल्याचे त्यात स्पष्ट दिसत आहे.
वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर अटकेच्या भीतीने राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे दोघे फरार झाले होते. या दोघांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोघांना आज (शुक्रवार) पहाटे अटक केली. या अटकेपूर्वी या दोघांनी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये मटणावर मनसोक्त ताव मारला. या विषयीचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे. त्याच्यासोबत काही मित्र होते, पण हे मित्र कोण होते? याची माहिती अद्याप समोर आली नाही. मित्रांचा राजेंद्र ला दूर पळवण्याचा डाव होता का? असा सवाल देखील विचारला जात आहे.
दरम्यान, वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल झालेले राजेंद्र आणि शशांक हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. हगवणे पिता-पुत्राला आम्ही सोडणार नाही, असा इशाराही अजितदादांनी दिला होता. दरम्यान, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवनवीन बाबी समोर येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काल कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली. त्या वेळी अजित पवार यांनी फोनवरून वैष्णवीचे वडील आनंद ऊर्फ अनिल कस्पटे यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. यावेळी वैष्णवीच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले होते.