(मुंबई)
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाच्या काँग्रेसच्या खा. वर्षा गायकवाड यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. असिफ सिद्दीकी यांनी ही याचिका दाखल केली होती. गायकवाड यांनी केलेल्या निवडणूक प्रचारात गैरव्यवहार केला आणि प्रक्रियांचे उल्लंघन केले, असा आरोप सिद्दीकी यांनी केला होता. मात्र न्या. शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने ही याचिका फेटाळली.
मतांसाठी गायकवाड यांनी पैसे वाटले, प्रचाराच्या हँडबिल्सवर छपाई नियमांचे पालन केलेले नव्हते, असा युक्तिवाद सिद्दीकी यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, गायकवाड यांचे वकील तेजस देशमुख यांनी सर्व आरोप खोडून काढले. सिद्दीकी यांनी आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे सादर केलेले नाहीत, तसेच पैसे वाटल्याचे व्हिडीओही सादर केलेले नाहीत, असे देशमुख यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.