(नाशिक)
पुण्याहून मालेगावकडे निघालेल्या खासगी ट्रॅव्हल बसचा नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात झाला. मालेगाव–मनमाड महामार्गावर व-हाणे गावाजवळ आज पहाटे सुमारे ३ वाजताच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल बस आणि पिकअप वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
अपघात इतका भीषण होता की धडकेचा आवाज परिसरात दूरवर ऐकू आला. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना बाहेर काढून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत.
अपघातात मृत्यू झालेल्या चारही प्रवासी मालेगाव येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, दोन्ही वाहनांची धडक कशी झाली, याचा तपास पोलीस करत असून पुढील कारवाई सुरू आहे.

