(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये तर्फ देवळे गावात यंदा घरगुती गणपती सजावटीत ‘पंढरपूर वारी’चा देखावा साकारण्यात आला आहे. हरेश गोरुले यांच्यासह गावातील पांगले कुटुंबीयांनी या देखाव्याची निर्मिती केली असून, तो संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
पांगलेवाडीतील हरेश पांगले व रमेश पांगले हे नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास असले तरी दरवर्षी गणेशोत्सवात गावी येतात. यंदा त्यांनी आपल्या घरगुती गणपती सजावटीत पंढरपूर यात्रेतील रथ, फुगड्या, वारकऱ्यांची वारी आणि इतर अनेक दृश्यांचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे, या वारीतील विविध प्रसंग चलचित्र माध्यमातून दाखवण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.
हा देखावा पाहण्यासाठी साखरपा परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असून, वारकऱ्यांचा उत्साह आणि पंढरपूरची अनुभूती गावातच मिळत असल्याचा अनुभव भक्तांना येत आहे.

