(देवरुख / सुरेश सप्रे)
देवरूख मधील सप्तलिंगी नदीकाठावरील ऐतिहासिक व धार्मिक आस्था असणार्या श्री रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आम. शेखर निकम यांच्या माध्यमातून आपण पुढाकार घेऊन करणार, असे हनिफ हरचिरकर त्यांनी स्पष्ट केले.
देवरुख नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक ११ मधील स्थानिक बैठकीत मधली आळीतील रहिवाशांनी मांडलेल्या पारंपरिक मागणीला महत्त्व देत महायुतीचे उमेदवार हनिफ हरचिरकर यांनी याबाबत माहिती दिली.
देवरुखचे नाव घेतले की सप्तलिंगी नदी, तिच्या काठावर विसावलेले प्राचीन देवस्थान असणारे श्री रामेश्वर मंदिर आणि या मंदिरात परिसरात अनेक पिढ्यांची संस्कृती असा समृद्ध इतिहास आहे. येथे धार्मिक विधी केले जातात. यात सामाजिक एकता गुंफलेली आहे. स्थानिक नागरिकांनी वर्षानुवर्षे या मंदिराच्या दुरुस्तीची मागणी केली होती. मधली आळीतील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांनी बैठकीत ही मागणी पुन्हा एकदा मांडत आपल्या भावना व्यक्त केल्या.
श्री रामेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार करताना मूळ ढाचा, प्राचीन वास्तुकला आणि सांस्कृतिक स्वरूप अबाधित ठेवूनच काम केले जाईल. देवस्थानाच्या पवित्रतेला हात न लावता सुशोभीपणा, आकर्षकता आणि भव्य रूप देण्याचा प्रयत्न करू, तसेच सप्तलिंगी काठावर नवीन धार्मिक–पर्यटन केंद्राची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत असेही हरचिरकर यांनी सांगितले
सप्तलिंगी काठावर असलेल्या या प्राचीन मंदिराचा नवा, परंतु संस्कृती जपणारा आविष्कार देवरुख नगरपंचायतच्या विकसित आणि आदर्श शहराच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरू शकतो.
नगराध्यक्षपदासाठी मृणाल शेट्ये आणि वार्ड क्रं 11 मधून हनिफशेठ हरचिरकर या महायुती उमेदवारांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन आ. शेखर निकम यांनी केले.

