(संगमेश्वर)
तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या न्यायहक्कासाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या ‘निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर (रेल्वे)’ या फेसबुक ग्रुपने पुन्हा एकदा कोकण रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांकडे लक्ष वेधले आहे.
या पत्रात स्थानकाच्या वाढत्या प्रवासी संख्येचा आणि विक्रमी वार्षिक उत्पन्नाचा उल्लेख करून, येथे दररोज १८०० हून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या महत्त्वाच्या स्थानकात अद्यापही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची गंभीर बाब अधोरेखित करण्यात आली आहे.
प्रमुख समस्या म्हणून, दोन्ही फलाटांना जोडणाऱ्या पादचारी पुलावर आच्छादन (पत्र्याचे छत) नसल्यामुळे उन्हाळ्यात उन्हाचा आणि पावसाळ्यात पावसाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. या पुलावर त्वरित छत बसवण्याची गरज आहे, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे.
तसेच रत्नागिरीकडील दिशेने फलाट क्रमांक एक व दोन यांना जोडणारा स्वतंत्र पूल तातडीने उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या फलाट क्रमांक दोनवर उतरलेले प्रवासी अर्धे फलाट उलट दिशेने चालून फलाट एकाकडे पोहोचतात. वृद्ध, महिला, लहान मुले व आजारी प्रवाशांसाठी ही प्रवासपद्धती अत्यंत त्रासदायक ठरते.
याशिवाय, फलाट क्रमांक एकवरील काही कौलारू प्रवासी निवारा शेड्स मोडकळीस आले असून, त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. सध्या पावसात या शेडखाली पाणी ठिबकत असून प्रवाशांना ओलेचिंब होऊन बसावे लागत आहे. ही स्थिती प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घातक ठरू शकते, असा इशाराही दिला आहे.
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाचे ऐतिहासिक आणि पर्यटक दृष्टिकोनातून असलेले महत्त्व लक्षात घेता येथे मडगाव, जामनगर, पोरबंदर या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, यासाठीही यापूर्वी पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, इतक्या विक्रमी उत्पन्न असूनही या स्थानकाकडे कोकण रेल्वे प्रशासन दुर्लक्ष का करते आहे, असा थेट आणि परखड सवाल या संघटनेचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांनी उपस्थित केला आहे.