(मुंबई)
मराठी मनोरंजनविश्वासाठी दुःखद वार्ता समोर आली आहे. ‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ मालिकेतील अविस्मरणीय ‘गुंड्याभाऊ’ साकारलेले ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालं आहे. आज (गुरुवार) सकाळी सुमारे १०.१५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती कन्या स्वाती कर्वे यांनी सोशल मीडियावरून दिली. नुकताच त्यांनी २५ ऑगस्ट रोजी आपला ९५ वा वाढदिवस साजरा केला होता.
‘गुंड्याभाऊ’ बनून घराघरात पोहोचले
२५ ऑगस्ट १९३० रोजी जन्मलेल्या बाळ कर्वेंनी १९७९ मध्ये प्रसारित झालेल्या ‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली. मालिकेतील गुंड्याभाऊची भूमिका इतकी गाजली की लोक त्यांना प्रत्यक्ष आयुष्यातही त्या नावानेच हाक मारू लागले. “आजही विलेपार्ल्यातून फिरताना लोक मला ‘गुंड्याभाऊ’ म्हणतात,” असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
रंगभूमी आणि छोटा पडदा गाजवला
बाळ कर्वे यांनी रंगभूमी, दूरदर्शन आणि सिनेमांत आपली बहुमुखी कला दाखवली.
नाटके : सूर्याची पिल्ले, रथचक्र, तांदुळ निवडता निवडता, मनोमनी, कुसुम मनोहर लेले
मालिका : प्रपंच, राधा ही बावरी, वहिनीसाहेब, उंच माझा झोका
चित्रपट : जैत रे जैत (पहिला चित्रपट), सुंदरा सातारकर, चांदोबा चांदोबा भागलास का, चटक चांदणी, बन्याबापू
सई परांजपे यांच्या ‘कथा’ या चित्रपटात त्यांनी काम केले होते. तर ‘प्रीतीचे झुळझुळ पाणी’ हे लोकप्रिय गाणे त्यांच्यावरच चित्रित झाले होते.
अभिनयासोबतच व्यक्तिमत्वाचाही ठसा
उत्कृष्ट अभिनय, मराठी भाषेवरील प्रभुत्व, नम्र स्वभाव, सहकलाकारांशी असलेली मैत्री आणि कामावरील निष्ठा यामुळे बाळ कर्वे यांनी वेगळी छाप पाडली. त्यांच्या जाण्याने मराठी नाट्य-चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्राने एक बहुमोल कलाकार गमावला आहे. कलाविश्वातील मान्यवर आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

