(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा (एनएचएआय) गलथान आणि अत्यंत बेजबाबदार कारभार मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांच्या मुळावर उठला आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते बावनदी दरम्यान वर्षानुवर्षे रखडलेले चौपदरीकरण, अपूर्ण जोडरस्ते आणि दिशादर्शक फलकांचा पूर्णपणे अभाव यामुळे हा संपूर्ण पट्टा वाहनचालकांसाठी जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या अवघ्या आठवडाभरात या भागात सात भीषण अपघात घडले असून, प्रवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे. इतक्या घटना घडूनही प्राधिकरणाचे अधिकारी वातानुकूलित कार्यालयात बसून डोळेझाक करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भिजत घोंगडे सुरू आहे. ठेकेदारांवर अंकुश ठेवण्यात महामार्ग प्राधिकरण पूर्णपणे अपयशी ठरले असून, आरवली ते बावनदी दरम्यान अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. धक्कादायक म्हणजे, हे रस्ते अद्याप वाहतुकीस योग्य नसतानाही प्राधिकरणाने त्यावरून वाहतूक सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, उंच-सखल भाग आणि अर्धवट जोडरस्त्यांमुळे वाहनचालकांना ऐनवेळी कसरत करत अचानक वळणे घ्यावी लागत आहेत. याचा सर्वाधिक फटका दुचाकीस्वार आणि स्थानिक नागरिकांना बसत असून, दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनाचा कळस म्हणजे सोनवी पुलावर गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अचानक बॅरिकेड्स लावून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वाहतूक वळवताना नियम धाब्यावर बसवून कुठेही ठळक सूचनाफलक लावलेले नाहीत. परिणामी, भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनचालकांचा ऐन पुलावर गोंधळ उडून वाहनांवरील नियंत्रण सुटत आहे. पुलावरील आणि जोडमार्गावरील रस्त्याच्या पातळीत मोठी तफावत असल्याने वाहने आदळून अपघातांना निमंत्रण मिळत आहे. संगमेश्वर ते कोळंबे परिसरातही सुस्थितीत पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात प्राधिकरण अपयशी ठरल्याने वाहनचालकांची मोठी कुचंबणा होत आहे.
महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले सावधानतेचे फलक, रात्री चमकणारे परावर्तक (रिफ्लेक्टर्स), सुरक्षापट्ट्या आणि भक्कम बॅरिकेड्स उभारण्याची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणाची आहे. मात्र, या संपूर्ण पट्ट्यात सुरक्षा उपकरणांचा पूर्णपणे दुष्काळ दिसून येतो. रात्रीच्या अंधारात रस्त्याचा आणि वळणांचा अंदाज न आल्याने वाहने थेट बॅरिकेड्स किंवा खड्ड्यांवर आदळत आहेत. वारंवार अपघात होऊनही प्राधिकरणाचे अभियंते आणि अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. केवळ टोल वसुलीचे स्वप्न पाहणाऱ्या महामार्ग प्राधिकरणाने आधी प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला हा जीवघेणा खेळ तात्काळ थांबवून महामार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे आणि तोपर्यंत संपूर्ण पट्ट्यात पुरेशी सुरक्षा व्यवस्था, प्रकाशयोजना व स्पष्ट दिशादर्शक फलक उभारावेत, अशी देखील मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.


