(राजापूर /रत्नागिरी प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्याच्या केवळ पोकळ घोषणा करणाऱ्या आरोग्य विभागाचा भोंगळ आणि ‘वरातीमागून घोडे’ असा कारभार राजापूर तालुक्यात चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यातील करक कारवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तब्बल २३ वर्षांपासून एका खासगी भाड्याच्या घरात सुरू आहे. या केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम एप्रिल २०२३ मध्ये सुरू होऊनही, तीन वर्षे उलटली तरी ते अद्याप अर्धवट अवस्थेतच रखडले आहे. मोडकळीस आलेल्या घरात सुरू असलेल्या या आरोग्य केंद्रामुळे पंचक्रोशीतील रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची अतोनात ससेहोलपट होत आहे.
सध्या हे प्राथमिक आरोग्य केंद्र अशोक नारकर यांच्या राहत्या घरात कसेबसे चालवले जात आहे. या घराचे छप्पर पूर्णपणे मोडकळीस आले असून, तिथे स्वच्छतागृहाची योग्य सोय नाही आणि पुरेसे पाणीही उपलब्ध नाही. अशा अत्यंत गैरसोयीच्या आणि अपुऱ्या जागेत रुग्णांवर उपचार करावे लागत असल्याने वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे. उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांनाही या दुरवस्थेचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नवीन इमारतीच्या तळमजल्याचे काम पूर्ण करण्यासाठी ६० ते ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, संथगतीने सुरू असलेल्या आणि अर्धवट राहिलेल्या बांधकामामुळे ही इमारत अद्याप वापराविना पडून आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते या इमारतीच्या पूर्णत्वासाठी आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. निधीची कमतरता भासू नये आणि हे केंद्र त्वरित कार्यान्वित व्हावे, यासाठी कार्यकर्त्यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचीही भेट घेऊन कैफियत मांडली आहे.
जैतापूर पूर्ण, मग कारवलीवर अन्याय का?
विशेष म्हणजे, याच कालावधीत राजापूर तालुक्यातीलच जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य इमारत पूर्ण होऊन ती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत उभी आहे. एकाच तालुक्यात एक इमारत पूर्ण होते, मग करक कारवलीच्या इमारतीलाच कोणाची नजर लागली? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.


