(रत्नागिरी /प्रतिनिधी)
पवित्र पोर्टल पदभरती २०२५ अंतर्गत जिल्ह्यातील रिक्त पदांसाठी आयोजित समुपदेशन प्रक्रियेला उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सोमवारी रत्नागिरी पंचायत समितीच्या पेजे सभागृहात पार पडलेल्या या प्रक्रियेत २०२ पैकी तब्बल १९९ उमेदवारांनी प्रत्यक्ष हजेरी लावली. केवळ तीन उमेदवार अनुपस्थित राहिले. उपस्थित सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची काटेकोर पडताळणी करून त्यांना तात्काळ शाळा निवडीसह रुजू होण्याचे नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
समुपदेशनासाठी सकाळपासूनच उमेदवारांनी पेजे सभागृहात मोठी गर्दी केली होती. प्रशासनाने केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे कागदपत्र पडताळणी, पसंतीक्रमानुसार शाळा वाटप आणि नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने पार पडली. काही दिवसांपूर्वीच उर्दू माध्यमाच्या ८ शिक्षकांची भरती समुपदेशनाद्वारे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली होती. त्या प्रक्रियेलाही उमेदवारांचा शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याने उर्दू शाळांमधील प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेली पदे भरली गेली आहेत. जिल्ह्यात यापूर्वीही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने शिक्षक भरती राबवण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात प्राथमिक शिक्षक, तर त्यानंतर पदवीधर आणि विषय शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. असे असले तरी, जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विशेषतः गणित, विज्ञान आणि इंग्रजी या महत्त्वाच्या विषयांच्या शिक्षकांची कमतरता प्रकर्षाने जाणवत होती. नव्या पदवीधर शिक्षकांच्या नियुक्तीमुळे विषयांच्या शिक्षकांची ही मोठी उणीव आता मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे.
या भरतीचा सर्वाधिक लाभ जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना होणार आहे. शिक्षकांअभावी अनेक शाळांमध्ये एकाच शिक्षकावर सर्व वर्गांचा भार येत होता. आता नव्या दमाचे पदवीधर शिक्षक उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळेल आणि अध्ययनाचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या समुपदेशन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शिक्षण सभापती नंदकुमार, शिक्षणाधिकारी मनीषा जगदाले आणि उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. नवनियुक्त शिक्षकांनी विहित मुदतीत संबंधित शाळांवर रुजू व्हावे आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन जिल्ह्याचा शैक्षणिक नावलौकिक वाढवावा, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.


